लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : अजिंठा-बुलडाणा-खामगाव या राष्ट्रीय महामार्गाच्या बांधकामादरम्यान पैनगंगा नदीच्या खोलीकरणाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आ. हर्षवर्धन सपकाळ यांनी मार्गी लावला आहे. या राष्ट्रीय महामार्गाच्या बांधकामासाठी लागणारे गौण खनिज पैनगंगा नदी व इतर लगतच्या गाव तलावातून उपलब्ध करून घेण्यात येणार असून, त्या माध्यमातून पैनगंगा नदीचे पुनर्जीवन होणार आहे.केंद्र शासनाने अजिंठा-बुलडाणा-खामगाव या मार्गास राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा दिला असून, रस्त्याच्या निर्मितीचे काम सुरू झाले आहे. त्यापैकी अजिंठा ते बुलडाणा या ४९ किमी मार्गापैकी अंदाजे २६ किमी लांबीपर्यंत समांतरपणे पैनगंगा नदीचा प्रवाह आहे. सुमारे ३१ किमीपर्यंतचे पैनगंगा नदीचे पात्र या रस्त्याच्या लगत उपलब्ध होत असल्याने रस्ता बांधकामासाठी लागणारे गौण खनिज या पात्रातूनच उपलब्ध करून घेण्याबाबत व त्या माध्यमातून पैनगंगा नदीचे खोलीकरण तसेच पुनर्जीवनाचा प्रस्ताव गेल्या नऊ महिन्यांपासून आ. सपकाळ यांनी शासन दरबारी लावून धरला होता.त्यास मूर्तरूप आले असून, राष्ट्रीय महामार्ग क्र. ७५३-ई च्या बांधकामासाठी लागणार्या एकूण दहा लाख २७ हजार क्युबीक मीटर गौण खनिजापैकी पहिल्या टप्प्यात तीन लाख ४0 हजार २00 क्युबीक मीटर गौण खनिज हे पैनगंगा नदीपात्रासोबतच मढ, चौथा, पाडळी येथील एकूण पाच गाव तलवातून उपलब्ध करून घेण्यात येणार आहे. यापूर्वी पैनगंगा नदीच्या पुनर्जीवनासाठी चार कोटी ९७ लाख रुपयांचा निधी मंजूर करून आणला होता. या निधीमधून कोलवडपासून मढपयर्ंत सिमेंट बांधसुद्धा उभारण्यात आले आहेत.
स्थळ निश्चितीकरण पूर्णया अनुषंगाने १२ जानेवारीला कोलवड, दत्तपूर, देऊळघाट, पळसखेड, चौथा, मढ, पाडळी या गावांसह पैनगंगेची सुमारे दहा किमी फेरी आ. हर्षवर्धन सपकाळ यांनी केली होती. यावेळी त्यांच्या समवेत बुलडाणा उपविभागीय अधिकारी सुरेश बगळे, लघुपाटबंधारे विभागाचे अभियंता नागपूरे, पाटील, केंद्रीय महामार्ग प्राधिकरणाचे माजी कार्यकारी अभियंता व्ही. डी. पाटील, कॉंग्रेस तालुका अध्यक्ष सुनील तायडे, रसुल खान, अमोल तायडे, भागवत वानेरे, संबंधित भागातील गावांचे सरपंच कौतिकराव पाटील, आरिफ खान, गजानन गायकवाड, भारत भिसे, संगीता जाधव, विजय कड, छाया मुळे, सविता जाधव, संगीता पवार उपस्थित होत्या.