सिंदखेडराजा : साधू, संत येती घरा, तोची दिवाळी, दसरा... दिवाळी, दसरा तोची आम्हा सण, सखे संतजन भेटतील...जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या अभंगातील या ओळी सार्थ ठरविणारा संतोत्सव उद्या १६ जुलै रोजी मातृतीर्थात साजरा होणार आहे. निमित्त आहे ते, संतश्रेष्ठ गजानन महाराज यांच्या दिंडी सोहळा पंढरीची वारी पूर्ण करून हा परतीच्या प्रवासात आहे.
मराठवाड्यातील जालना येथे दोन दिवस मुक्काम करून पालखी १६ जुलैला दुपारी चार वाजता मातृतीर्थ सिंदखेडराजा शहरात येणार आहे. रामेश्वर मंदिरात भोजन व्यवस्था करण्यात आली आहे. गेल्या ५० वर्षांपासून हा पालखी सोहळा पौराणिक महत्व असलेल्या रामेश्वर मंदिरात येतो. येथे सोबत असलेल्या वारकऱ्यांची भोजन व्यवस्था केली जाते. त्यानंतर पालखी जिजामाता विद्यालयाच्या प्रांगणात विसावतो. येथे श्रींच्या दर्शनासाठी हजारो भाविकांची गर्दी होते.
असा असेल पालखीचा मार्ग
मागील वर्षापासून पालखी शहरात येण्याच्या मार्गात पालखी व्यवस्थापनाने बदल केला आहे. दोन वर्षाआधी हा पालखी सोहळा जालना येथून मुख्य रस्त्याने बस स्थानक येथे येवून सोमवार पेठ मार्गे रामेश्वर मंदिर येथे जात होता. तेथील भोजन आटोपून नगर परिषद प्राथमिक मुक्काम होत असे, मात्र मागील दोन वर्षांपासून हा पालखी सोहळा मोती तलाव येथून शहरात येणाऱ्या नागपूर डाकलाईन या रस्त्याने जिजामाता नगर येथून रामेश्वर मंदिरात येतो. वारकऱ्यांचे पायी चालण्याचे अंतर कमी व्हावे, या उद्देशाने पालखी व्यवस्थापनाने हा निर्णय घेतला आहे.