- विवेक चांदूरकर लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांचा अष्टशताब्दी अवतारदिन महोत्सव २० आॅगस्ट रोजी साजरा करण्यात येत आहे. हा महोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येणार होता. मात्र, कोरोनामुळे सार्वजनिक ठिकाणी कार्यक्रम आयोजित न करता घरोघरी दिवे लावून संपूर्ण देशभर दीपोत्सव साजरा करण्यात येणार आहे.अखिल जीव- जातीच्या उद्धारासाठी परब्रह्म परमेश्वर श्री चक्रधर स्वामींनी गुजरातची राजधानी भडोच येथे युवराज हरिपाळदेवाचे पतित उठवून शके ११४३ मध्ये अवतार स्वीकारला.श्री चक्रधर स्वामींनी महाराष्ट्रात येवून अज्ञानरूपी अंधकाराने विषमतेत खितपत पडलेल्या समाजाला बंधुभावाचा, समानतेचा, मानवतेचा संदेश दिला. स्त्रियांना शिक्षणाचा अध्यात्माचा, मोक्षाचा अधिकार दिला. शुद्ध आचरणाने सर्व मानवजातीला अध्यात्माचा अधिकार दिला.खेडापाड्यात गोंड, भील्ल यांच्यात तथा समाजामध्ये जावून ब्रह्मविद्या ज्ञानाचा प्रकाश दाखविला. त्यातून महदंबेसारखी महिला मराठीची आद्य कवयित्री, म्हाईंभट्टांसारखे हजारो प्रकांडपंडित समानतेचा संदेश घेऊन समाजपरिवर्तन करू लागले. त्यांनी प्रवर्तन केलेल्या ईश्वरीय ज्ञान मार्गाला समाजाने महानुभाव नाव दिले. समाजप्रवर्तक सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामींच्या अवतरणाला २० आॅगस्ट रोजी ८०० वर्षे पूर्ण होत आहेत.त्यानुषंगानेच हा अष्टशताब्दी महोत्सव २० आॅगस्ट रोजी प्रारंभ होऊन पुढील २०२१ पर्यंत भारतभर साजरा करण्यात येत आहे. त्यामुळे २० आॅगस्ट रोजी अवतारदिनाच्या कार्यक्रमाचे वेळी सर्व संत-महंत-तपस्विनी व उपदेशी तथा अनुयायी आश्रम, तीर्थस्थान, देवपूजा, घरासमोर जास्तीत जास्त दीप लावून विडावसर, आरती करून संपूर्ण भारतात आनंद उत्सव साजरा करणार आहेत.अष्ट शताब्दी महोत्सवानिमित्त प्रत्येकाने घरात कमीत कमी आठ दिवे लावून उत्सव साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यामुळे या महोत्सवाला यावर्षी महत्त्व प्राप्त झाले आहे. जिल्ह्यातही नागरिक घरोघरी दीपात्सव साजरा करणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घरोघरी हा उत्सव होणार आहे.
वर्षभर प्रबोधनाचे आॅनलाइन कार्यक्रमश्री चक्रधर स्वामी यांच्या अष्टशताब्दी महोत्सवाला २० आॅगस्ट २०२० पासून प्रारंभ होत आहे. पुढील एक वर्ष हा महोत्सव साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त वर्षभर विविध प्रबोधनात्मक आॅनलाईन कार्यक्रम पार पडणार आहेत. यामध्ये चक्रधर स्वामींचे कार्य, त्यांनी जगाला दिलेला संदेश यावर प्रकाश टाकण्यात येणार आहे.
२० आॅगस्ट रोजी महानुभाव पंथातील सर्वांनी घरोघरी दीप लावावे. तसेच आश्रम, तीर्थस्थान या ठिकाणी जास्तीत जास्त दीप लावून महोत्सव साजरा करावा.- आचार्य श्री लोणारकर मोठेबाबाअध्यक्ष, अ.भा. पंचकृष्ण प्रबोधन परिषद श्रीक्षेत्र जाळीचादेव, बुलडाणा.