लोणार : शहरातील माेकळ्या जागांवर गत काही दिवसांपासून घाण पाणी साचल्याने नागरिकांचे आराेग्य धाेक्यात आले आहे. नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न सोडविण्यासाठी लोणार नगर परिषद कार्यालयात अधिकारी, कर्मचारी, नगरसेवक यांच्या बैठका घेण्यात येतात; मात्र त्यातून काहीही साध्य हाेत नसल्याने आराेग्याचे प्रश्न ‘जैसे थे’ आहेत.
शहरातील नाल्यांमध्ये कचरा व गाळ तुंबल्याने सांडपाणी रत्यावरून वाहत जात मोकळ्या जागेच्या भूखंडावर साचत आहे. यामुळे परिसरातील नागरिक दुर्गंधीयुक्त वास आणि डासाने त्रस्त झाले आहेत. नगर परिषदमध्ये संबंधित विषयाच्या अर्जाला परस्पर केराची टोपली दाखविली जात असल्याने प्रश्न निकाली न निघता समस्या वाढत चालल्या आहेत. नियोजनाच्या अभावामुळे शहरात ठिकठिकाणी खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. शहरातील गजबजलेल्या आझाद नगरमध्ये सखल भागात मोठ्या प्रमाणावर पाणी साचले आहे. परिसरातील मोकळ्या जागा नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत आहेत. नाल्यांमध्ये पाणी साचून राहत असल्याने त्यामध्येही सापांचा वावर दिसतो. यामुळे लहानग्या मुलांना बाहेर वावरू देण्यास नागरिक कचरत आहेत. साचलेल्या पाणी आणि घाणीमुळे डासांची निर्मिती होऊन रोग पसरण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. यासंदर्भात आरोग्य सभापतींना विचारणा केली असता, दररोज सफाई होत असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले होते . यावरून आरोग्य सभापती या गंभीर परिस्थितीपासून अनभिज्ञ असल्याचे दिसून येते. दरम्यान, शहरातील वाढत चाललेल्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी पालिकेची यंत्रणा कुचकामी ठरत असल्याने नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे.
जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींकडून समस्या सुटत नसतील तर गंभीर बाब आहे. जनतेचे काम करता येत नसतील तर पदाचा राजीनामा द्यावा.
सुरेश अंभोरे, भाजप तालुका उपाध्यक्ष, लोणार.
आमच्याकडे कोणत्याही तक्रारी प्राप्त झालेल्या नाहीत. आधीपेक्षा आता कामे चांगली होत आहेत.
पूनम पाटोळे, नगराध्यक्ष, लोणार.