लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : गेल्या सव्वा महिन्यापूर्वी फेकून देण्यात आलेल्या नवजात अर्भकाच्या माता-पित्याचा शोध लावत पोलीस व बाल कल्याण समिती तथा बुलडाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी सामाजिक बांधिलकीतून शोध घेत सव्वा महिन्याच्या अर्भकास कुटुंबाचे छत्र मिळवून दिले आहे. विशेष म्हणजे समाजाच्या भीतीपोटी पुढे न येणाऱ्या अर्भकाच्या आईचा व त्याच्या पित्याचा ‘मातोश्री’वरच समेट घडवून आणत त्यांच्या रेशीमगाठीही जुळविल्या. एखाद्या चित्रपटात शोभावी अशी ही कहाणी प्रत्यक्षात रविवारी बुलडाण्यात सत्यात आली.अनवधानाने पडलेल्या चुकीच्या पावलामुळे गर्भवती राहलेल्या युवतीने सामाजिकतेचा विचार करत आपल्या नवजात अर्भकाला सांडपाण्याच्या डबक्याजवळ सोडून दिले. त्या नवजात अर्भकाच्या हाताचा श्वानांनी लचका तोडल्यानंतर त्याच्या विव्हळण्याच्या आवाजाने नागरिकांनी त्याची सुटका करत सव्वा महिन्यापूर्वी बालकल्याण समितीच्या हवाली केले. मात्र नंतर अर्भकाच्या विरहाने व्याकूळ झालेल्या आईला नैसर्गिक प्रवृत्तीनुसार पाझर फुटला आणि बालकाला स्तनपान करण्याचा मोह तिला आवरला नाही. आपलेच मूल असल्याचे सांगत तिने बालसंरक्षण समितीसमोर मुलाला ताब्यात देण्याची विनंती केली. मात्र तोवर तिच्यावर पोलिसांत गुन्हाही दाखल झाला होता. त्यातून कसेबसे ही युवती बाहेर पडली, पण सामाजाच्या भीतीपोटी घर सोडून बुलडाण्यात नवजात अर्भकासोबत भुकेने व्याकूळ होवून हिंडत होती. शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनीही प्रारंभी जेवणासाठी तिला मदत केली. मात्र अशी मदत कोण आणि किती दिवस करणार. त्यातूनच या युवतीला विश्वासात घेत संपूर्ण माहिती त्यांनी जाणून घेतली आणि तेथून नियतीने तिच्यावर उलटवलेला डाव पुन्हा सरळ दिशेने फिरला. नात्यातीलच ज्या युवकाकडून तिला गर्भधारणा राहिली होती त्याच्या कुटुंबीयांशीही संपर्क साधला गेला आणि आमदार संजय गायकवाड, बुलडाणा ग्रामीण पोलीस ठाण्यातील एपीआय सारंग नवलकार, बालकल्याण समितीच्या सदस्य ॲड. किरण राठोड व काही नागरिकांच्या उपस्थितीत आमदार गायकवाड यांच्या ‘मातोश्री’ या जनसंपर्क कार्यालयावर ही युवती व तिचा प्रियकर यांचे रविवारी शुभमंगल झाले. नियतीने अग्निपरीक्षा घेतल्यानंतर पुन्हा अर्भक आणि त्याच्या जन्मदात्यांची एकत्रित भेट हाही एक नियतीचा अजब खेळ म्हणावा लागेल. मात्र या अनोख्या विवाह आणि अर्भक व माता-पित्यांचा हा संगम समाजाला एक नवा आशेचा किरण देऊन गेला आहे.
माता-पित्याच्या लग्नातच अर्भकाचे नामकरणअर्भकाच्या माता-पित्यांच्या या विवाहातच अर्भकाचे नामकरणही आमदार संजय गायकवाड यांनी केले. नियतीने झिडकारल्यानंतर पुन्हा नियतीला त्याच्या कल्याणासाठी झुकवणाऱ्या या अर्भकाचे नावही ‘स्वराज’ असे नाव आमदार संजय गायकवाड यांनी ठेवले. एकीकडे अर्भकाच्या माता-पित्यांच्या डोक्यावर लग्नाच्या अक्षदा पडताच अर्भकाचेही नामकरण झाले.