लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : कोरोना विषाणू संसर्गामुळे खामगाव आणि परिसरात भीतीचे सावट पसरले असतानाच निगेटिव्ह म्हणून रुग्णालयातून सुटी दिलेला रूग्ण पॉझिटिव्ह आढळला. त्या रूग्णाला परत आणण्यासाठी आरोग्य प्रशासनाला चांगलीच दमछाक करावी लागली. दरम्यान, एकाच कुटुंबातील असलेल्या रूग्णांच्या नावातील गोंधळामुळे खामगाव येथील कोविड केअर सेंटरवर गुरूवारी दुपारी एकच गोंधळ उडाला.खामगाव शहरातील चांदमारी परिसरातील एका कुटुंबातील एक जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला. त्याच्या नजिकच्या संपर्कातील कुटुंबियांना तात्काळ क्वारंटीन करण्यात आले. या कुटुंबातील सर्वच सदस्यांना घाटपुरी रोडवरील कोविड केअर सेंटरमध्ये क्वारंटीन करण्यात आले. यामधील काहींचा अहवाल निगेटिव्ह आल्याने दोघांना सुटी देण्यात आली. तत्पूर्वी त्यांच्या हातावर होम क्वारंटीनचा शिक्का मारण्यात आला. दरम्यान, गुरूवारी रात्री यातील एक जण पॉझिटिव्ह आल्याचे कोविड केअर सेंटरवरील डॉक्टरांच्या निदर्शनास आले. त्यानंतर एकाच कुटंबातील दोन सदस्यांच्या नामसाधर्म्यामुळे डॉक्टरांचा गोंधळ उडाला. एका व्यक्ती ऐवजी दोन्ही व्यक्तींना फोन करून बोलाविण्यात आल्यामुळे कोविड केअर सेंटरमधील हलगर्जीबाबत या कुटुंबातील व्यक्तींनी रोष व्यक्त केला. यासंपूर्ण प्रकाराबाबतचा गोंधळ गुरूवारी दुपारपर्यंत निवळला नव्हता. त्यामुळे कोविड केअर सेंटरवर एकच गोंधळ उडाला होता. तथापि, आरोग्य विभागाच्या या गोंधळाबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी संबंधितांचे चांगलेच कान टोचले. त्यानंतर आरोग्य अधिकाऱ्यांनी या प्रकरणी सारवासारव केली.
वरिष्ठांचे दुर्लक्षकोविड केअर सेंटरवरील कारभाराकडे वरिष्ठ अधिकाºयांचे दुर्लक्ष होत आहे. गत काही दिवसांपासून या सेंटरवर धांदल उडत आहे. गुरूवारचा प्रकार कोविड केअर सेंटरवरील डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे घडल्याची चर्चा आहे.२२ जणांचे अहवाल प्रलंबित !कोरोना संशयीत म्हणून कोविड केअर सेंटरवर क्वारंटीन करण्यात आलेल्या २२ जणांचा स्वाब नमुना अहवाल अद्यापही प्रलंबित आहे. त्यामुळे कोविड केअर सेंटरवर चांगलाच गोंधळ निर्माण होत आहे. क्वारंटीन करण्यात आल्यानंतर सहा-सात दिवस अहवाल मिळत नसल्याने कोरोना संदिग्ध रूग्णांची चांगलीच हेळसांड होत असल्याचे चित्र आहे.