संग्रामपूर (बुलढाणा): नववर्षाच्या पर्वावर पश्चिम विदर्भात हॉलिडे स्टेशन म्हणून सुप्रसिद्ध असलेल्या संग्रामपूर तालुक्यातील अंबाबरवा अभयारण्यातील जैवविविधता संपन्नतेच्या नोंदी तसेच पक्ष्यांची गणना कागदावर उतरणार आहे. या अभयारण्यात ३० डिसेंबरपासून पक्षी सर्वेक्षणास सुरुवात झाली. ती २ जानेवारीपर्यंत चालणार आहे.
कार्यक्रमात सहभागी पक्षी अभ्यासक २ जानेवारीपर्यंत अभयारण्यातील ३ बीटमधील संपूर्ण परिसर पिंजून काढत विविध पक्ष्यांची अधिकृत नोंद कागदावर घेणार आहेत. या सर्वेक्षणामुळे अंबाबरवा अभयारण्यातील पक्ष्यांची प्रजातीबाबतची माहिती समोर येणार आहे. मेळघाट व्याघ्र प्रकल्पात समाविष्ट संग्रामपूर तालुक्यातील अंबाबरवा अभयारण्यात गतवर्षी पार पडलेल्या पक्षी सर्वेक्षणात दुर्मीळ काळ्या पंखांच्या कोकीळ खाटिक पक्ष्याची नोंद झाली आहे. नवीन वर्षात २ जानेवारीला अभयारण्यात वास्तव्यास असलेल्या पक्ष्यांच्या प्रजाती समोर येणार आहेत. वाघांसह विविध पक्षी तथा वन्यजीवांचे सुरक्षित अधिवासाचे माहेरघर असलेले अंबाबरवा अभयारण्य बुलढाणा जिल्ह्यात अप्रतिम पर्यटनस्थळ म्हणून नावारुपाला आले आहे.
- ६ पक्षी अभ्यासकांचा समावेशसर्वेक्षणासाठी विविध भागातील ६ पक्षी अभ्यासक सहभागी झाले आहेत. अभयारण्यातील चुनखडी, शेंबा, अंबाबरवा या ३ बीटमध्ये पक्षी सर्वेक्षण सुरू आहे. दररोज सकाळी ६:०० ते १०:०० व दुपारी २:०० ते संध्याकाळी ६:०० वाजेपर्यंत पक्षी सर्वेक्षण करण्यात येत आहे.
अंबाबरवा अभयारण्यात पक्षी सर्वेक्षणाला सुरुवात झाली असून, यामध्ये ६ पक्षी अभ्यासकांचा सहभाग आहे. गतवर्षी अभयारण्यात दुर्मीळ काळ्या पंखांच्या कोकीळ खाटिक पक्ष्याची नोंद झाली. यावर्षीसुद्धा नवीन पक्ष्यांच्या प्रजातीच्या नोंदी होण्याची दाट शक्यता आहे. - सुनील वाकोडे, वनपरिक्षेत्र अधिकारी, सोनाळा