निवडणुकांच्या तोंडावर रेखाताई खेडेकर यांच्या घरवापसीची चर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2019 02:24 PM2019-06-28T14:24:01+5:302019-06-28T14:25:04+5:30
त्यातच ऐन निवडणुकांच्या तोंडावर रेखाताई खेडेकर यांची घरवापसी होणार असल्याच्या चर्चांनी जोर धरल्याने काँग्रेसची डोकेदुखी वाढली आहे.
- सुधीर चेके पाटील
चिखली : लोकसभा निवडणुकीत भाजपला अभूतपूर्व यश मिळाले. त्यात चिखली मतदारसंघात खा. प्रतापराव जाधव यांना प्रतिकूल स्थितीत मिळालेले मताधिक्य पाहता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पाहून युतीला मतदान केल्याचे स्पष्ट झाले, ही बाब खुद्द खा. जाधव यांनी मान्य केली. या पृष्ठभूमीवर विधानसभा निवडणुकीत अशीच परिस्थिती असेल का? अशी चर्चा आता सुरू झाली आहे. त्यातच ऐन निवडणुकांच्या तोंडावर रेखाताई खेडेकर यांची घरवापसी होणार असल्याच्या चर्चांनी जोर धरल्याने काँग्रेसची डोकेदुखी वाढली आहे.
आता सर्वांच्या नजरा विधानसभा निवडणुकीकडे लागल्या आहेत. लोकसभेतील यशाने भाजपचा उत्साह, आत्मविश्वास दुणावला. यातूनच चिखलीतून भाजपाकडून इच्छूक उमेदवारांची संख्या वाढली आहे. इच्छूकांच्या संख्येत झालेली वाढ ही अंतर्गत स्पर्धा व गटबाजीला पोषक ठरली असल्याने कार्यकर्ते विभागल्या गेले आहेत. पर्यायाने भाजपाला हा गड पुन्हा काबिज करणे तितकेसे सोपे नाही. दहा वर्षांपूर्वी भाजपाचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चिखली मतदार संघात भाजपाच्या तिकिटावर विधानसभेची हॅट्रीक साधणाºया रेखाताई खेडेकर यांच्या पश्चात येथील भाजपा विखुरल्याचे मान्य करावे लागले. त्यांच्या काळात येथील भाजप एकसंघ होती. मात्र, नंतर पक्षांतर्गत घडामोडी आणि रेखातार्इंनी राष्टÑवादीत प्रवेश केल्यामुळे भाजपामध्ये रस्सीखेच वाढली. त्यातून विधानसभेत सलग दोन वेळा भाजपाला येथे पराभव पत्करावा लागला. यंदा ही पुनर्रावृत्ती टाळण्याची शक्यता पाहत भाजपातर्फे रेखाताई खेडेकर देखील संधीचे सोने करू शकतात. त्या देखील भाजपाचे संकटमोचक गिरीष महाजन यांच्या संपर्कात असल्याचे विश्वसनिय वृत्त असून त्यांच्या भाजपात घरवापसी जोरदार चर्चा आहे. मध्यंतरी त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस, प्रदेशाध्यक्ष दानवे, नितीन गडकरी यांच्यासह जुन्या जाणत्या सहकाऱ्यांशी संपर्क साधल्याने चर्चांना दुजोरा मिळत आहे. या चर्चेसोबतच रेखातार्इंचे खंदे समर्थक सक्रीय झाले. त्यांच्या मते रेखातार्इंची घरवापसी झाल्यास भाजपातील अंतर्गत गटबाजीला लगाम बसून भाजपाचा बालेकिल्ला पुन्हा एकदा अभेद्य राहू शकतो. असेच बदल दहा वर्षांपूर्वी झाल्याने रेखातार्इंचे तिकिट कापल्या गेले. ते का आणि कसे याची कारणमिमांसा करण्याला आता काही अर्थ नाही. मात्र, त्यांचे तिकिट कापल्यामुळे पक्षाला सोसावे लागलेले नुकसान पाहता ‘डॅमेज कंट्रोल’साठी त्यांना पुन्हा पक्षात घेण्यासाठी भाजपाकडून देखील फिल्डींग लावली गेली असल्याचे समजते. याबाबत रेखाताई खेडेकर यांनी अद्याप काही स्पष्ट केले नसले तरी मतदार संघात सर्वत्र या चर्चेला उधान आले आहे. चर्चांनुसार रेखातार्इंची घरवापसी झाल्यास भाजपातर्फे उमेदवार देखील त्याच राहणार असल्याने या चर्चांमुळे काँग्रेसची डोकेदुखी वाढणार आहे.