एसटीच्या उत्पन्नाला ब्रेक
मेहकर : कोरोनामुळे एसटीचीही चाकेही आता थांबली आहेत. कडक निर्बंधामुळे प्रवासी नसल्याने येथील आगारातून सध्या एकही बस जात नाही. त्यामुळे एसटी महामंडळाच्या उत्पन्नालाच ब्रेक लागला आहे.
मोताळा तालुक्यात ५३ पॉझिटिव्ह
मोताळा : शहर व तालुक्यात १६ मे रोजी एकूण ५३ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. कोरोनाबाधितांची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता येथील कोविड सेंटरमध्ये खाटा वाढविण्याची गरज निर्माण झाली आहे.
बाजार समित्यांच्या कोविड सेंटरची प्रतीक्षा
बुलडाणा : कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता बाजार समित्यांनी आपापल्या आवारात कोविड केअर सेंटर सुरू करावे, असे परिपत्रक पणन संचालनालयाने काढले आहे. परंतु, अद्यापही बाजार समित्यांच्या कोविड केअर सेंटरची प्रतीक्षा आहे.
थंड पाण्याच्या दुकानाला पाच हजारांचा दंड
मेहकर : लाॅकडाऊनच्या काळात थंड पाण्याची विक्री करताना गर्दी केल्याप्रकरणी मेहकर येथील विदर्भ ॲक्वाला पाच हजार रुपयांचा दंड करण्यात आला आहे. तहसीलदार डॉ. संजय गरकळ व मुख्याधिकारी सचिन गाडे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.
“एक जिल्हा एक उत्पादन”
बुलडाणा : केंद्र शासनाने आत्मनिर्भर भारत पॅकेजअंतर्गत प्रधानमंत्री योजना असंघटित व अनोंदणीकृत अन्नप्रक्रिया उद्योगासाठी प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य उद्योग उन्नयान योजना पाच वर्षांच्या कालावधीसाठी आहे. ही योजना “एक जिल्हा एक उत्पादन” या धर्तीवर राबविली जाणार आहे. याचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
रुग्णालयांना रेमडेसिविरचा पुरवठा
बुलडाणा : पुरवठा झालेल्या रेमडेसिविर इंजेक्शनची संख्या बघता राखीव कोट्यातील इंजेक्शनचा पुरवठासुद्धा रुग्णालयांना करण्यात येत आहे. सर्व संबंधित डॉक्टर्स व फार्मासिस्ट यांनी या औषधाचा वापर हा योग्यरीत्या व अत्यावश्यक असलेल्या रुग्णांकरिताच प्राधान्याने वापरावा, असे आदेश निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.
फळबागधारक शेतकऱ्यांना फटका
किनगाव राजा : लॉकडाऊनमध्ये वाहतुकीची सेवा उपलब्ध झाली नसल्याने फळबागधारक शेतकऱ्यांना फटका बसला. बाजारपेठेत माल नेता आला नाही. त्यामुळे फळे सुकायला लागली आहेत. शेतकऱ्यांनी मिळेल त्या भावाने फळांची विक्री सुरू केली.
पाणीणीटंचाई निवारणार्थ विंधन विहीर मंजूर
दुसरबीड : पाणीटंचाई निवारणार्थ परिसरातील काही गावांमध्ये विंधन विहीर मंजूर करण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे पाणीटंचाई दूर होण्यास मदत होईल. कामे सुुरू करण्यापूर्वी व काम पूर्ण झाल्यानंतर ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी कामाचा पंचनामा करावयाचा आहे.
खतांवर सबसिडी द्या
बुलडाणा : खरीप हंगामाच्या तोंडावर सध्या खतांच्या किमती मोठ्या प्रमाणावर वाढलेल्या आहेत. अर्थचक्र बिघडलेल्या शेतकऱ्यांना महागडे खत घेणे परवडणारे नाही. त्यामुळे खताच्या किमती कमी कराव्या किंवा खतांवर सबसिडी देण्यात यावी, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.
डिझेलअभावी थांबली मशागतीची कामे
बुलडाणा : कडक निर्बंधामुळे पेट्रोलपंपही बंद करण्यात आले आहेत; परंतु सध्या शेती मशागतीच्या कामाचे दिवस आहेत. त्यामुळे डिझेलअभावी ट्रॅक्टरने होणारी मशागतीची कामे थांबली आहेत.