जानेफळः- जानेफळ परिसरात मोठ्या प्रमाणात मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट झाला असून चर्मरोगाने आजारी असलेल्या मोकाट कुत्र्यांंमुळे नागरिक तसेच लहान बालकांना सुद्धा चर्मरोगाचा त्रास होत असल्याने या मोकाट कुत्र्यांचा त्वरित बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.
जानेफळ परिसरात मोकाट कुत्र्यांच्या संख्येत कमालीची वाढ झाली आहे. मोठ्या प्रमाणात या कुत्र्यांना चर्म रोगाची लागण झालेली असून अनेक कुत्र्यांच्या अंगावरील संपूर्ण केस गळालेले असल्याने त्यांच्या शरीरावर मोठ्या प्रमाणात जखमा झालेल्या आहेत व शरीर खाजवत हे मोकाट कुत्रे गावभर फिरत असल्याने त्यांच्या या चर्मरोगाचा परिणाम मानवी शरीरावर सुद्धा होत असल्याचे बोलले जात असून नागरिक महिला तसेच लहान बालकांना सुद्धा खाजेची लागण झालेली दिसत आहे. यामुळे बुलडाणा, मेहकर यासारख्या शहरात त्वचारोग तज्ज्ञांकडे जाऊन महागडा उपचार करावा लागत आहे. तेव्हा या चर्मरोगाचा फैलाव होण्यापूर्वीच त्याला पायबंद घालून मोकाट कुत्र्यांचा सुद्धा त्वरित बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे.