लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : थंडीने शहरवासियांना त्रस्त केले असतानाच यातून त्वचेच्या विविध आजारांचा सुद्धा नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. थंडीमुळे शहरातील नागरिकांमध्ये ड्रायस्कीनचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. त्वचा कोरडी पडल्याने खाजेचा त्रास वाढला आहे. लहान मुले व ज्येष्ठ नागरिक सर्वाधिक प्रभावित होत आहेत. शासकीय रुग्णालय आणि खासगी रुग्णालयांमध्ये सध्या ड्रायस्कीन व दम्याचे रुग्ण मोठया प्रमाणावर पाहायला मिळत आहेत. थंडीमुळे सामान्य वेठीस धरले जात आहेत. यातच अनेक आजारही वाढू लागले आहेत. थंडीमध्ये प्रामुख्याने ड्रायस्कीनचे प्रमाण वाढत असते. थंडीमध्ये त्वचेची योग्य काळजी न घेतल्यास त्वचा कोरडी होते. त्यामुळे खाज सुटते. ही खाज जास्त वाढल्यास त्वचा लालसर होऊन खराब होण्याची शक्यता असते. तसेच थंडीमध्ये दम्याचे रुग्ण, लहान मुले आणि वृद्धांनी जास्त काळजी घेण्याची गरज असते. अँलजीर्चे प्रमाणही वाढते. तसेच एक्झिमा वाढतो. त्यामुळे सध्या रुग्णालयात ड्रायस्कीन व दम्याच्या रुग्णांचे प्रमाण सर्वाधिक आढळून येत आहे.
अशी घ्या थंडीपासून विशेष काळजी !
* आंघोळ करण्यासाठी अतिशय कडक
गरम पाण्याचा वापर करू नये.
* कोमट पाण्याचा वापर करावा.
* आंघोळीपूर्वी अर्धा तास अगोदर सरसोचे तेल अंगाला लावावे.
* आंघोळीनंतर जैतुनचे तेल वापरावे.
* लहान मुले व जेष्ठ नागरिकांची विशेष काळजी घ्यावी.
* थंडीपासून बचाव करणारे स्वेटर, कपडे आदींचा वापर करावा.
* थंडीपासून बचावासाठी उपलब्ध असणाºया क्रिमचा वापर करावा.
उन्हाळ्यात जशी उन्हापासून काळजी न घेतल्यास सनस्ट्रोक होण्याची भीती असते, त्याचप्रमाणे थंडीमध्ये सुद्धा विशेष काळजी घेण्याची गरज आहे. कडाक्याच्या थंडीचे वारे हे त्वचेसाठी अतिशय घातक असतात. त्यातून कोल्ड ट्रामा होण्याची भीती असते.
- डॉ. निलेश टापरे, निवासी वैद्यकीय अधिकारी, सामान्य रुग्णालय, खामगाव.