नांदुरा (बुलडाणा) : ट्रॅक्टरच्या डिझेल टँकमध्ये साखर टाकल्याने इंजिन दुरुस्तीसाठी लागणारा ३० हजार रुपयांचा खर्च अगोदर देण्यास मान्य केल्यानंतर नकार देत जातीवाचक शिवीगाळ करणे, महिलांना लोटपाट केल्याने दोन गटात हाणामारी झाल्याची घटना २ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता दरम्यान तालुक्यातील नारखेड येथील बसस्थानकावर घडली.
गावातील राजेंद्र बाबुसिंग डाबेराव (३२) यांनी नांदुरा ठाण्यात तक्रार दिली. त्यामध्ये गणेश फुंडकर याने त्यांच्या ट्रॅक्टरच्या डिझेल टाकीत साखर टाकल्याने ते नादुरुस्त झाले. दुरुस्तीसाठी ३५ हजार रुपयांचा खर्च होता, तो देण्याचे त्याचा भाऊ निलेश फुंडकर याने मान्य केले. २ सप्टेंबर रोजी त्याला पैसे मागितले असता त्याने जातीवाचक शिवीगाळ केली. तसेच जीवे मारण्याची धमकी दिली. वाद सोडवण्यासाठी आई व पत्नी मध्ये आली असता इतर आरोपींनी त्यांनाही शिवीगाळ व लोटपाट करून वाईट उद्देशाने हात पकडला, असे म्हटले. त्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी निलेश फुंडकर, सचिन सुरेश फुंडकर, गणेश वसंता फुंडकर, वसंता समाधान फुंडकर, सुरेश लक्ष्मण फुंडकर सर्व रा. नारखेड यांच्या विरोधात भादंविच्या विविध कलमांसह अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आले. निलेश फुंडकर (२७) यानेही तक्रार दिली. त्यामध्ये त्याचे टिप्पर क्रमांक एमएच-२८, बीबी-१२३१ या वाहनाने रेती खाली करण्यास जात असताना राजेश डाबेराव याने त्याची दुचाकी वाहनासमोर आडवी लावली. तसेच ट्रॅक्टर दुरुस्तीसाठी ३० हजार रूपयांची मागणी केली. देण्यास नकार दिला असता गाडीच्या खाली ओढून चाकू मारण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी सचिन फुंडकर याने मागे ओढल्याने डाव्या हातावर मार लागला.
सुरेश फुंडकर, वसंता फुंडकर, मंगेश सुखदेव तायडे हे आवरण्यासाठी आले असता त्यांना इतर आरोपींनी मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली, असे म्हटले. त्यानुसार पोलिसांनी आरोपी राजेश बाबुसिंग डाबेराव, संजय बाबुसिंग डाबेराव, चेतन कैलास ठाकूर, सागर राजेश ठाकूर, आकाश खंडेराव, उमेश बाबुसिंग डाबेराव सर्व रा. नारखेड यांच्याविरुद्ध भादंविच्या कलमानुसार गुन्हे नोंदवण्यात आले. पुढील तपास अनुक्रमे उपविभागीय पोलीस अधिकारी (मलकापूर) अभिनव त्यागी, नापोकॉ गजानन इंगळे करीत आहेत.