जळगाव जामोद, दि. २१ नवनियुक्त नगराध्यक्ष सीमा डोबे व १८ नगरसेवक यांनी पदभार स्वीकारताच प्रथम पदवीधर मतदारसंघाची व नंतर जिल्हा परिषद, पंचायत समितीची निवडणूक जाहीर झाल्याने आदर्श आचारसंहिता जारी झाली. त्यामुळे नगराच्या नवीन विकास कामांना तर खोडा बसलाच; पण नवीन लोकप्रतिनिधींच्या उत्साहावरसुद्धा विरजण पडले आहे.नगर परिषदेची गत एक महिन्यापासून सर्वसाधारण सभा नाही. विषय समित्यांचे गठन झाले; परंतु त्याचाही सभा नाही. नगर परिषदेचे कामकाज कसे असते, याची उत्सुकता नवीन नगरसेवकांना असते; परंतु आचारसंहितेमुळे नगर परिषदेत सभेनिमित्त जाण्याची संधीसुद्धा नगराध्यक्ष सीमा डोबे व नवीन नगरसेवकांना नाही. नगर परिषदेत विविध विकास कामांसाठी निधी येत राहतो. तो निधी सर्वसाधारण सभेत किंवा विषय समि त्यांच्या सभेत कशाप्रकारे खर्ची घालावा, याची चर्चा होते; परंतु ही संधीसुद्धा नवीन नगरसेवकांना मिळाली नाही. नगरसेवकांना व नगराध्यक्षांना अधिकृतरीत्या आतापर्यंत फक्त तीन वेळा नगर परिषदेत जाण्याचा योग आला. नवीन नगराध्यक्षांनी ज्या दिवशी पदभार घेतला, तेव्हा उपाध्यक्षाची व स्वीकृत नगरसेवकांची निवड झाली तेव्हा आणि विषय समितीची निवड झाली तेव्हा अशा तीन वेळा नगराध्यक्ष व सर्व नगरसेवकांचे नगर परिषद पदार्पण झाले होते. त्यानंतर सहज म्हणून नगरसेवक व नगराध्यक्ष हे नगर परिषदेत गेले असतील; परंतु आचारसंहि तेमुळे कोणतीही सभा झाली नाही. त्यामुळे मोठय़ा मेहनतीने मिळविलेल्या विजयाचा आनंद नगराध्यक्ष सीमा डोबे व नगरसेवकांना अद्याप घेता आला नाही. तशीच स्थिती नवीन विकास कामांची आहे. मागच्या बॉडीत जी विकास कामे मंजूर झाली होती, ती कामे मोठय़ा प्रमाणावर जळगाव नगरात सुरू आहेत.
नवीन विकास कामांना आचारसंहितेचा खोडा!
By admin | Published: January 22, 2017 2:57 AM