मेहकर (बुलडाणा): मेहकर ते अंत्री देशमुख मार्गावरील रस्त्यावर अंदाजे १0 ते १५ गाव असून, या रस्त्याची दयणीय अवस्था झाल्याने, या मार्गावर सध्या एकही एसटी बस जात नसल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत. संबंधित विभागातील अधिकारी जाणीवपूर्वक याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप गावकर्यांनी केला आहे. मेहकर ते अंत्री देशमुख या रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. गेल्या १0 वर्षांपूर्वी या रस्त्यावरील डांबरीकरण करण्यात आले होते. या रस्त्यावरुन अंत्री देशमुख ते गुंधा, हिरडव आदी १0 ते १५ गाव लागतात. एवढेच नाही तर अंत्रीदेशमुख मार्गाने लोणार जाण्यासाठी ७ कि.मी.चे अंतर कमी लागते; मात्र या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडल्याने वाहने येणे-जाणे पूर्णपणे बंद आहे. काही वर्षांपूर्वी या रस्त्यावरुन महामंडळाच्या दररोज चारवेळा एसटी बस धावत होत्या; मात्र रस्त्याअभावी बससेवा बंद पडल्यामुळे एसटी महामंडळाचे लाखो रुपयांचे उत्पन्न बुडत आहे; तसेच गावकर्यांचेही हाल होत आहेत. तरी संबंधित अधिकार्यांनी याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे. अंत्री देशमुख रस्त्यावरील पैनगंगा नदीच्या उत्तरेकडील १२00 मीटरचा रस्ता डीपीडीसीतून मंजूर झाला. २५ लाख रुपये या कामासाठी मंजूरही झाले; मात्र अद्यापपर्यंत या कामाला सुरुवात करण्यात आली नाही. तर दुसरीकडे पैनगंगा नदीतील पुलाच्या दक्षिणेकडील रस्ता जि.प. बांधकाम विभागाकडे येत असून, या कामाला निधी नसल्याचे कारण पुढे करुन अधिकारी दुर्लक्ष करीत आहेत. अंत्रीदेशमुख रस्त्यावर दोन्ही बाजूने बाभळींची झाडे पूर्णपणे झुकल्याने मोटारसायकल व चारचाकी वाहनाला रस्ता दिसत नसल्याने कोणत्याही वेळी अपघात होण्याची दाट शक्यता आहे.
मेहकर-अंत्री देशमुख रस्त्याची दूरवस्था
By admin | Published: November 05, 2014 11:45 PM