पंचायत राज समिती अध्यक्ष तथा आ. संजय रायमूलकर यांनी जिल्ह्यातील पीक विमा योजनेबाबत अधिवेशनात शुक्रवारी प्रश्न मांडला होता. खरीप हंगाम २०२० मध्ये जिल्ह्यात प्रधानमंत्री पीक विमा योजनेची अंमलबजावणी रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीमार्फत करण्यात आली. जिल्ह्यातील २.९५ लाख शेतकऱ्यांनी २२.०८ कोटी रक्कम विमा हफ्ता भरला. २.२६ लाख हेक्टर क्षेत्र पिकांकरिता संरक्षित करण्यात आले होते. योजनेंतर्गत स्थानिक नैसर्गिक आपत्ती झालेले नुकसान या बाबींतर्गत एकूण १४ हजार ३४३ शेतकऱ्यांना नुकसान भरपाई रक्कम १४.१६ कोटी रुपये विमा कंपनीमार्फत वाटप करण्यात आली. काढणी पश्चात नुकसान भरपाई या बाबींतर्गत १३१८ शेतकऱ्यांना नुकसान भरपाई रक्कम ०.९० कोटी रुपये निश्चित करण्यात आली आहे. इतर रक्कम वाटपाची कार्यवाही सुरू आहे. विमा कंपनीकडून प्राप्त अंतरिम अहवालानुसार उत्पन्नावर आधारित ८ हजार २८४ शेतकऱ्यांना नुकसान भरपाई रक्कम १.२४ कोटी रुपये निश्चित करण्यात आली असून वाटप कंपनीस्तरावर सुरू आहे. मेहकर तालुक्यातील एकाच गावातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना समान रक्कम न मिळाल्याने शेतकऱ्यांनी १५ डिसेंबरला तालुका कृषी अधिकारी यांना घेराव घातला होता. ही बाब भुसे यांनी मान्य केली. तालुक्यातील पीक विमा योजनेमध्ये २७ हजार १ शेतकऱ्यांनी १.८७ कोटी रुपये विमा हफ्ता भरला होता. २० हजार ८१७ हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित केले आहे. योजनेंतर्गत स्थानिक नैसर्गिक आपत्ती झालेले नुकसान या बाबींतर्गत २ हजार ७३३ शेतकऱ्यांना नुकसान भरपाई रक्कम ३.६८ कोटी रुपये वाटप करण्यात आले आहे. इतर शेतकऱ्यांना वाटप सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली.
जिल्ह्यात पीक विम्याचे १४.१६ कोटी रुपये वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 09, 2021 4:37 AM