लाेणार येथील दुर्गा टेकडीवर वृक्षाराेपण
लाेणार : येथील दुर्गा टेकडी लोणारचे निर्माते पुंडलिकराव बानाजी मापारी यांच्या व मान्यवरांच्या हस्ते या टेकडीवर वृक्षारोपण करण्यात आले. या प्रसंगी नायब तहसीलदार हेमंत पाटील, मुख्याधिकारी विठ्ठल केदारे, शिवछत्र मित्रमंडळ अध्यक्ष नंदू मापारी, नगरसेवक संतोष पाटील व इतर नागरिक उपस्थित हाेते.
गाेपीनाथ मुंडे यांना अभिवादन
लाेणार : स्थानिक कृउबा समितीच्या वतीने लोकनेते गोपीनाथ मुंडे यांना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यात आले. यावेळी अनेक मान्यवरांनी गोपीनाथ मुंडे यांच्या जीवन कार्याविषयी मनोगत व्यक्त केले, तसेच गोपीनाथ मुंडे यांच्या प्रतिमेला कृउबास सभापती संतोष मापारी यांनी दीपप्रज्वलन, हारार्पण करून अभिवादन केले.
सिद्धांताश्रम वरवंड येथे पाण्याच्या टाकीचे उद्घाटन
मेहकर : सिद्धांत आश्रम वरवंड येथे क्रीडा विभाग बुलडाणा यांच्याकडून पाण्याची टाकी मंजूर करण्यात आली आहे. या पाण्याच्या टाकीचे भूमिपूजन आमदार डाॅ.संजय रायमुलकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सहदेवराव अल्हाट, तेजराव जाधव आदींसह इतर उपस्थित हाेते.
काेराेनाने चांगले धडे शिकविले
उंद्री : गतवर्षीपासून आलेली काेराेना महामारीची भयंकर लाट आपल्याला बरेच धडे शिकवून गेली. अहाेरात्र सुसाट वेगाने सैरावैरा धावणारा माणूस मृत्यूचे भय उराशी बाळगून काेराेनाच्या दहशतीखाली अचानक कासवाच्या गतीने चालायला शिकला, असे मत मुरलीधर महाराज हेलगे यांनी व्यक्त केले.
ग्रामीण भागात आयुर्वेदिक काढ्याला महत्त्व
सुलतानपूर : काेराेनाची दुसरी लाट ग्रामीण भागापर्यंत पाेहोचली हाेती. अनेकांना काेराेनाची लागण झाल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. सध्या ग्रामीण भागात आयुर्वेदिक काढ्याला महत्त्व आले आहे.
गुड माॅर्निंग पथक गायब
धामणगाव बढे : परिसरातील अनेक गावंमध्ये गुड माॅर्निंग पथक गायब झाल्याचे चित्र आहे. त्यामुळे पुन्हा उघड्यावर शाैच करण्याचे प्रमाण वाढले आहे. पावसाळ्यास सुरुवात हाेणार असल्याने, गुड माॅर्निंग पथके स्थापन करण्याची गरज आहे.
ग्रामीण भागातील रस्त्याची दुरवस्था
जानेफळ : परिसरातील गत काही दिवसांपासून रस्त्याची दुरवस्था आली आहे. माेठमाेठे खड्डे पडल्याने, वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. याकडे बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन रस्त्यांची दुरुस्ती करण्याची मागणी हाेत आहे.
पांदण रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी
धामणगाव बढे : परिसरातील अनेक शेतरस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. खरीप हंगामास काही दिवसांचा अवधी शिल्लक राहिलेला आहे. त्यामुळे पांदण रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
सवलतीत धान्य मिळाल्याने दिलासा
बुलडाणा : काेराेना संसर्ग वाढत असल्याने, राज्य शासनाने विविध याेजनांच्या माध्यमातून सर्वसामान्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजना आणि शेतकरी योजनेंतर्गत समाविष्ट न झालेल्या केशरी शिधापत्रिकाधारकांनाही आता सवलतीत धान्य देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असून, त्याची अंमलबजावणी जून महिन्यापासून हाेणार आहे.
बेबी केअर किटची लाभार्थ्यांना प्रतीक्षा
बुलडाणा : अंगणवाडी केंद्रामध्ये एकात्मिक बालविकास प्रकल्पाकडून प्रथम प्रसूत मातेला बेबी केअर किट वाटप करण्यात येते. या योजनेकडे प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याने अनेकांना बेबी केअर किटची प्रतीक्षा आहे.
रोजगार सेवकांचे मानधन थकले
बुलडाणा : गेल्या दोन महिन्यांपासून रोजगार सेवकांचे मानधन थकल्याने, रोजगार सेवकांसमोर आर्थिक संकट निर्माण झाले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कडक निर्बंध लावण्यात आल्याने अनेकांच्या हातांना काम नाही. त्यामुळे उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची मागणी हाेत आहे.