महा ई-सेवा केंद्र बंदने अडचणी
बुलडाणा : राज्य शासनाने महाडीबीटी पोर्टलवर बियाण्यांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन केले आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. परंतु, सध्या महा ई-सेवा केंद्र बंद असल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत.
९८ पॉझिटिव्ह
मेहकर : शहर व तालुक्यात बुधवारी ९८ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. कोरोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेता, गावागावात आता रॅपिड तपासणी शिबिर घेण्याची गरज निर्माण झाली आहे. त्यामध्ये तालुक्यातील काही गावांमध्ये कोरोना तपासणी शिबिराला सुरूवातही झाली आहे.
शिवभोजनची पार्सल सेवा
बुलडाणा : लाॅकडाऊनमधील अत्यावश्यक सेवेत काही सवलती जाहीर करण्यात आलेल्या आहेत. त्यामध्ये शासनाकडून देण्यात येणाऱ्या शिवभोजन सेवेसाठी पार्सलची मुभा देण्यात आली आहे. सकाळी १० ते १२ व रात्री ७ ते ९ यावेळेत शिवभोजनची पार्सल सेवा राहणार आहे.
परिचारिकांचा सत्कार
मेहकर : तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये जागतिक परिचारिका दिनानिमित्त परिचारिकांचा सत्कार करण्यात आला. दिनांक १२ मे रोजी सर्व नियमांचे पालन करून हा सत्कार करण्यात आला. कोरोना महामारीच्या काळात परिचारिका देवदूत बनून काम करत आहेत.
ग्रामीण भागात स्वच्छतेकडे दुर्लक्ष
मेहकर : तालुक्यात ज्या गावात एकही कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण नाही, त्याठिकाणचे नागरिक अद्यापही बेफिकीर आहेत. ग्रामंपचायतीकडून सुरूवातीला धूर फवारणी, निर्जंतुकीकरण औषधांची फवारणी करण्यात आली. मात्र, गावातील स्वच्छतेचे काय? असा प्रश्न आजही कायम आहे.
धरणातील पाण्याची पातळी झाली कमी
बुलडाणा : शहरासह परिसरातील गावांना पाणीपुरवठा होणाऱ्या येळगाव धरणातील पाण्याची पातळी आता कमी झाली आहे. धरण क्षेत्रातील जमिनीवर भेगा पडलेल्या दिसून येतात. त्यामुळे परिसरातील पाणीपुरवठाही विस्कळीत होत आहे.
यंदा पशुपालकांना अडचण
हिवरा आश्रम : गतवर्षी मोफत बियाण्यांमुळे चाऱ्याची लागवड झाल्याने जिल्ह्यात मुबलक चारा होता. सध्या लॉकडाऊनमुळे जिल्ह्यातील चाऱ्याची बाहेरच्या जिल्ह्यातही विक्री बंद आहे. परंतु, यंदा चारा टंचाईकडे सर्वांचे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे पशुपालकांसाठी हे अडचणीचे ठरत आहे.
शुद्ध पाण्याची गरज
मोताळा : कोरोना विषाणू संसर्गाचे रुग्ण वाढतच आहेत. अशा या साथीच्या काळात अशुद्ध पाणी पिण्यात आल्यास नागरिकांचे आरोग्य अधिकच बिघडू शकते. त्यामुळे शहर तथा ग्रामीण भागात शुद्ध पाणीपुरवठा करणे आवश्यक आहे.
पीक कर्जासाठी शेतकरी त्रस्त
बुलडाणा : लॉकडाऊनच्या या परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना मदत करण्याऐवजी राष्ट्रीयीकृत बँक अधिकारी शेतकऱ्यांना नाहक त्रास देत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना पीक कर्जासाठी बँकेत वांरवार चकरा माराव्या लागत आहेत. अनेक कागदपत्रं वेळेवर मिळत नसल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत.
लसीकरणासाठी वाढली गर्दी
मेहकर : कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने लसीकरणासाठी गर्दी वाढत आहे. परंतु, अनेकांना लस मिळत नाही. त्यामुळे लसीकरण केंद्राच्या ठिकाणी वादाचे प्रकारही समोर येत आहेत.
दोन दिवसांपासून रस्त्यावर शुकशुकाट
सुलतानपूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कडक निर्बंध लागू केल्याने दोन दिवसांपासून सुलतानपूर येथे रस्त्यावर शुकशुकाट दिसून येत आहे. ज्याठिकाणी नियम पाळले जात नाहीत, तेथे नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे.
माठांच्या मागणीत वाढ
डोणगाव : अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर सध्या माठांच्या मागणीत वाढ झाली आहे. सध्या दुकाने बंद असल्याने विक्रेते घरोघरी फिरुन माठांची विक्री करत आहेत. १४ मे रोजी अक्षय तृतीयेचा सण आहे.