किनगाव जट्टू : येथे स्वस्त धान्य दुकानातून निकृष्ट चणाडाळीचे वितरण करण्यात येत असल्याने लाभार्थ्यांनी संताप व्यक्त केला आहे़ याकडे वरिष्ठांनी लक्ष देऊन दर्जेदार धान्याचे वाटप करण्याची मागणी हाेत आहे़
किनगाव जट्टू येथे स्वस्त धान्य दुकानातून प्रधानमंत्री गरीब व कल्याण योजनेअंतर्गत गोरगरीब जनतेला शिधापत्रिकेवर मोफत धान्यवाटप करण्यात येत आहे़ यामध्ये प्रतिव्यक्ती गहू तीन किलो, तांदूळ दोन किलो व प्रति कार्ड चणाडाळ एक किलो वाटप सुरू आहे़ वाटप करण्यात आलेली चणाडाळ निकृष्ट आहे़ ही डाळ काळी पडली आहे तसेच त्याला छिद्रही पडले आहेत़ दोन ते तीन किलो वजनाचे डाळीचे ढेकळसुद्धा तयार झाले आहेत. ही डाळ गुरांसमोर मांडली तर तेसुद्धा खाऊ शकणार नाहीत अशा प्रकारची डाळ स्वस्त धान्य दुकानातून मोफत घेण्यात येत असल्याचे चित्र आहे़ त्यामुळे शिधापत्रिकाधारकांत विशेषत: महिलावर्गात या प्रकाराबाबत रोष व्यक्त होत आहे.
दर्जेदार डाळीचे वितरण करा
काेराेनामुळे गतवर्षीपासून सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत़ गाेरगरिबांना दिलासा देण्यासाठी शासनाच्या वतीने माेफत धान्याचे वितरण करण्याची घाेषणा शासनाने केली आहे़ गुरेही खाणार नाहीत, अशा डाळीचे वितरण स्वस्त धान्य दुकानातून हाेत आहे़ त्यामुळे, शासनाकडूनही गाेरगरिबांची थट्टा सुरू असल्याचे चित्र आहे़ याकडे वरिष्ठांनी लक्ष देऊन दर्जेदार धान्याचे वितरण करण्याची मागणी लाभार्थ्यांनी केली आहे़
शासनाकडून मिळालेल्या धान्याचा पुरवठा
शासनाकडून मिळालेल्या डाळीचा आम्ही पुरवठा करताे. आम्हाला दर्जेदार डाळ मिळाल्यास त्याचा पुरवठा करण्यात येणार, असे स्वस्त धान्य दुकानदाराने सांगितले़