लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: संपूर्ण राज्य आणि बुलडाणा जिल्ह्यातील प्रत्येक गावाला उत्सुकता लागलेल्या ‘लोकमत सरपंच अँवॉर्ड्स’चे मंगळवार २0 जानेवारी रोजी दुपारी १ ते ४ या वेळेत जलंब रोडवरील पॉलिटेक्निक ग्राउंडवरील कृषी महोत्सवात वितरण होणार आहे. बुलडाणा येथे मध्यंतरी झालेल्या एका बैठकीत ज्युरी मंडळातील उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेश लोखंडे, उपविभागीय अधिकारी सुरेश बगळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी एस.ए. चोपडे आणि संवर्ग विकास अधिकारी सूर्यकांत भुजबळ या सदस्यांनी जिल्हय़ातील आदर्श सरपंचांची निवड केली होती.गावाच्या सर्वांगीण विकासाचे स्वप्न पाहणार्या व त्या स्वप्नांना मूर्तरूप देण्यासाठी झटणार्या मेहनती व कर्तबगार विजेत्या सरपंचांना मंगळवारी कृषी महोत्सवात कृषी व फलोत्पादन मंत्री ना. भाऊसाहेब फुंडकर यांच्या हस्ते दुपारी एक ते चार या कालावधीत होणार्या कार्यक्रमात गौरवांकित केले जाणार आहे. यावेळी खामगाव मतदारसंघाचे आमदार अँड. आकाश फुंडकर यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. बीकेटी टायर्स हे या उपक्रमाचे मुख्य प्रायोजक, ‘पतंजली आयुर्वेद’ हे प्रायोजक तर ‘महिंद्रा ट्रॅक्टर्स’ हे सहप्रायोजक आहेत. पहिल्याच वर्षी या पुरस्कारांना प्रचंड प्रतिसाद मिळाला असून, पुरस्कारासाठीची प्रचंड चुरस आणि उत्सुकता निर्माण झाली आहे. सरपंचांनी गावातील जल, वीज व्यवस्थापन, शिक्षण, स्वच्छता, आरोग्य, पायाभूत सेवा, ग्रामरक्षण, पर्यावरण, प्रशासन-लोकसहभाग, रोजगार, कृषी तंत्रज्ञान, उदयोन्मुख नेतृत्व, सरपंच ऑफ दि ईयर अशा १३ कॅटेगरीत केलेल्या कामांची पाहणी करून या प्रत्येक क्षेत्रासाठी पुरस्कार दिला जाणार आहे. त्यामुळे तो कोणाला मिळेल याबाबत उत्सुकता लागून राहली आहे. या सोहळ्यास जिल्ह्यातील सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन ‘लोकमत’च्या वतीने करण्यात आले आहे.
‘लोकमत सरपंच अँवॉर्ड्स’चे आज होणार थाटात वितरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2018 2:27 AM