लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : जिल्ह्यातील साखरेच्या नियतनातील तांत्रिक पेच सोडविण्यात अखेर जिल्हा प्रशासनाला यश आले. दीपावलीपूर्वीच साखर उपलब्ध झाल्याने, शीधापत्रिका धारकांच्या दीपावलीचा ‘गोडवा’ वाढणार असल्याचे दिसून येते. तथापि, हरभरा आणि उडीद दाळीची प्रतीक्षा संपलेली नाही.
राष्ट्रीय अन्न सुरक्षा लाभार्थ्यांना सार्वजनिक वितरण प्रणालीद्वारे दीपावली निमित्त स्वस्त धान्य दुकानातून उडीद आणि हरभरा दाळ देण्याचे जाहीर करण्यात आले. मुख्यमंत्र्यांनीही दीपावलीपूर्वी दाळीचे वितरण करण्याची घोषणा केली होती. मात्र, बुलडाणा जिल्ह्यातील लाभार्थ्यांसाठी मागणीपेक्षा कमी दाळीचा साठा पाठविण्यात आला. तर साखरेचा साठाच शिल्लक नव्हता. त्यामुळे जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकानदारांसमोर पेच निर्माण झाला होता. दरम्यान, साखरेच्या नियतनातील तांत्रिकपेच सोडविण्यात जिल्हा प्रशासनाला यश आले. जिल्ह्यातील शासकीय गोदामात साखरेचा पुरवठा झाला असून, जिल्ह्यातील काही स्वस्त धान्य दुकानदारांनी साखरेचे वितरण सुरू केले आहे. दरम्यान, दीपावली तोंडावर असतानाही अद्यापही दाळीची प्रतीक्षा संपलेली नाही. मागणीपेक्षा पुरवठा अत्यल्प असल्याने, जिल्ह्यातील अनेक स्वस्त धान्य दुकानदारांना नागरिकांच्या रोषाला बळी पडावे लागत आहे. यासंदर्भात जिल्हा पुरवठा अधिकारी बी.यू.काळे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी फोन रिसीव्ह केला नाही.
-कोट...
रेशन धान्याच्या तुटवड्याबाबत जिल्हा पातळीवर रेटा देण्यात आला. त्यानंतर आता साखरेचा पुरवठा सुरळीत करण्यात आला. मात्र, अद्यापही उडीद आणि हरभरा दाळीच्या पुरवठ्याचा प्रश्न मिटलेला नाही.
- रवि महाले
तालुकाध्यक्ष, स्वस्त धान्य दुकानदार संघटना, खामगाव.