नवीन मोदे
धामणगाव बढे : सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेच्या माध्यमातून तसेच ग्रामपंचायतीच्या विविध उपक्रमांतून मोताळा तालुक्यातील सिंदखेड येथे उभी राहिलेली वनराई व निर्माण झालेली हिरवळीची जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती यांना भुरळ पडली. त्यांनी या हिरवळीत काही वेळ घालवत वृक्षलागवडीचे काैतुक केले. गावकऱ्यांच्या सहकार्यातून सुमारे ६७ एकर उजाड रानमळात मागील काही वर्षांत सातत्याने केलेल्या वृक्षलागवडी साठी केल्या जाणाऱ्या परिश्रमाचे कौतुक जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी केले. पानी फाउंडेशनच्या समृद्ध गाव स्पर्धेच्या सन्मान सोहळ्यानिमित्त त्यांनी सिंदखेड गावाला २९ जुलै रोजी भेट दिली. शिवार फेरी दरम्यान त्यांनी पर्जन्यमापक स्थळ, गावाने तयार केलेल्या पोस्टिक गवत नर्सरी, बांधावरील वृक्षलागवड याचे बारकाईने निरीक्षण केले ग्रामपंचायत द्वारा केल्या जाणाऱ्या वृक्षलागवडीची व गवत लागवडीची पाहणी केली. प्रवीण कदम मागील काही वर्षांपासून ग्रामपंचायत व गावकरी जलसंधारण निसर्ग व पर्यावरण याबाबत करीत असलेल्या कामाचा लेखाजोखा मांडला.
३० एकरात केले वृक्षाराेपन
६७ एकर रानमळा पैकी तीस एकर एवढ्या मोठ्या भागात आतापर्यंत वृक्ष लागवड वृक्ष संवर्धनाचे काम पूर्ण झालेले आहे. विविध वृक्षांचे प्लॉट लावून त्यांना ऐतिहासिक टेकड्यांची नावे दिली आहे. माझी वसुंधरा या राज्य शासनाच्या उपक्रमात देखील सिंदखेड ग्रामपंचायतीने सहभाग नोंदविला असून दहा हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यापैकी सुमारे २ हजार ४०० वृक्ष लागवड आतापर्यंत करण्यात आलेली आहे़
सिंदखेड वासियांचे केले काैतुक
जिल्हाधिकाऱ्यांनी गावाची पुढील वाटचाल समजून घेतली तसेच एवढ्या मोठ्या प्रमाणावर जलवा मृदसंधारण सोबतच निसर्ग व पर्यावरणाचे काम करीत असल्याबद्दल सिंदखेड वासियांचे कौतुक केले. सुमारे एक ते दीड तास फिरून जिल्हाधिकाऱ्यांनी शिवारफेरी चे निरीक्षण केले व त्यांना ते भावल्याचे त्यांनी बोलून दाखविले . जिल्हाधिकाऱ्यांची ही, भेट आस्थेने केलेली, विचारपूस लहानशा गावासाठी दिलेला इतकावेळ ,केलेल्या कामाचं कौतुक ,तसेच आगे बढो म्हणत प्रशासन तुमच्या पाठीशी आहे हा दिलेला संदेश सिंदखेडा वासियांसाठी अविस्मरणीय होता.