लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: कोरोना या विषाणूजन्य आजाराच्या अनुषंगाने जिल्ह्यातील विविध शासकीय रूग्णालयातील स्थिती जाणून घेण्यासाठी जिल्हाधिकारी सुमनचंद्रा यांनी बुधवारी दुपारी उपजिल्हा सर्वोपचार रूग्णालयाला भेट दिली. येथे कोरोना रूग्णांनासाठी निर्माण करण्यात आलेल्या आयसोलेशन वार्डाची पाहणी केली. संभाव्य परिस्थिती हाताळण्याच्या सूचना उपस्थितांना दिल्या. कोरोना या विषाणूजन्य आजाराचा पॉझिटीव्ह रूग्ण अद्यापपर्यंत खामगाव शहरात आढळून आलेला नाही. त्याचवेळी खामगाव तालुक्यातील चितोडा येथील एक रूग्ण पॉझिटीव्ह आढळून आला आहे. या रूग्णाला बुलडाणा येथे क्वारंटाईन करण्यात आले आहे. त्याचवेळी खामगाव तालुक्यातील संशयास्पद असलेल्या तसेच अहवाल निगेटीव्ह आलेल्या रूग्णांना खामगाव येथील उपजिल्हा रूग्णालयात क्वारंटाईन करण्यात आले आहे. बुलडाणा जिल्ह्यातील कोरोना रूग्णांची वाढती संख्या लक्षात घेता, आवश्यक उपाययोजना करण्यासाठी जिल्हाधिकारी सुमनचंद्रा यांनी बुधवारी खामगाव आणि शेगाव येथील उपजिल्हा रूग्णालयात भेट दिली. रूग्णालयातील अत्यावश्यक सुविधांची माहिती जाणून घेतली. यावेळी निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. निलेश टापरे यांच्याशी चर्चा केली. रूग्णालयातील उपलब्ध सुविधांबाबत समाधान व्यक् केले. अतिरिक्त वार्डासाठी पाहणीभविष्यात जिल्ह्यात कोरोना संसर्गाच्या रूग्णांची संख्या वाढल्यास, खामगाव येथील उपजिल्हा सामान्य रूग्णालयात अतिरिक्त आयसोलेशन वार्ड तयार केल्या जाऊ शकतो का? या शक्यतेची पडताळणीही जिल्हाधिकाऱ्यांनी केली. कोरोना या विषाणूजन्य आजाराचा सामना करण्यासाठी आरोग्य प्रशासनाने तत्पर राहण्याचे निर्देशही जिल्हाधिकारी सुमनचंद्रा यांनी दिले. यावेळी उपविभागीय अधिकारी मुकेश चव्हाण, तहसीलदार शीतल रसाळ, मुख्याधिकारी धनंजय बोरीकर, उपविभागीय पोलिस अधिकारी प्रदीप पाटील, शहर पोलिस स्टेशनचे निरिक्षक सुनील अंबुलकर आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला उपजिल्हा सर्वोपचार रूग्णालयाचा आढावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 08, 2020 3:04 PM