बुलडाणा : महाबीज अंतर्गत राज्यातील चार जिल्ह्यांमध्ये खरीप व रब्बीसाठीच्या बीजोत्पादनात बुलडाणा जिल्हा अग्रेसर असून, या बीजोत्पादन कार्यक्रमाच्या माध्यमातून जिल्ह्यातील सहा हजार शेतकऱ्यांना वर्षाकाठी तब्बल ५२ कोटी रुपयांचा मोबदला मिळत आहे. दरम्यान, बाजारभावाच्या तुलनेत विचार करता २५ टक्के अधिक मोबदला मिळत आहे.
यंदाच्या खरीप हंगामात सोयाबीनच्या निकृष्ट बियाणांच्या उपस्थित झालेल्या मुद्द्याच्या पार्श्वभूमीवर माहिती घेतली असता ही बाब समोर आली आहे.
दरम्यान, खरीप हंगामामध्ये जिल्ह्यात १ लाख ७४ हजार क्विंटल बीजोत्पादनाचे उद्दिष्ट होते. १२ हजार ९८९ हेक्टरवर हा कार्यक्रम राबविण्यात आला होता. यामध्ये सोयाबीन ७१ हजार ४१६ क्विंटल सोयाबीन, ८३२ क्विंटल उडीद, ४२ क्विंटल मुगाचा समावेश आहे. तुरीचेही १,२८४ क्विंटल बीजप्रक्रियेसाठी आतापर्यंत उपलब्ध झाले असून, सोयाबीनचे ४४ हजार ६१० आणि उडिदाचे १६३ क्विंटल बियाणे येत्या काळात मिळण्याची शक्यता आहे.
दुसरीकडे जिल्ह्यात यंदा झालेल्या अतिवृष्टीमुळे बीजोत्पादन कार्यक्रमालाही फटका बसला असून, जवळपास ५६ हजार ८२५ क्विंटल बियाणे त्यामुळे यंदा कमी मिळण्याची शक्यता आहे. बुलडाणा जिल्ह्यात चिखली, मलकापूर आणि खामगाव येथे महाबीजचे बीजप्रक्रिया केंद्र आहेत. महाबीज कर्मचाऱ्यांच्या संपामुळे १३ दिवस शेतकऱ्यांचे बीजोत्पादनासाठीचे धान्य खरेदी करण्यात अडचणी आल्या होत्या. मात्र २५ डिसेंबरपासून त्यास पुन्हा सुरू झाली आहे. रब्बी हंगामातही हरभरा, गहू, ज्वारी आणि करडई या पिकांचे बीजोत्पादन केले जाते. त्या अनुषंगाने आतापर्यंत ३,१८४ हेक्टरपैकी ३०६५ हेक्टवर हा कार्यक्रम घेण्यासाठी बियाणे वाटप करण्यात आले आहे. दुसरीकडे खरीप व रब्बी हंगामासाठी घेण्यात येणाऱ्या बीजोत्पादन कार्यक्रमामध्ये सहा हजार शेतकरी सहभागी असून, यंदा ५,६४५ शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील बीजोत्पादन कार्यक्रमात सहभाग घेतला होता.
९८ हजार क्विंटल गुणवत्तापूर्ण बियाणे मिळणार
बीजोत्पादन कार्यक्रमांतर्गत खरिपासाठी यंदा जिल्ह्यातून ९८ हजार क्विंटल गुणवत्तापूर्ण बियाणे मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू असून, कच्चे बीज म्हणून महाबीजच्या बुलडाणा विभागास १ लाख १८ हजार क्विंटल बियाणे यंदा मिळेल, अशी माहिती महाबीजचे जिल्हा व्यवस्थापक आर. एस. मारोळे यांनी ‘लोकमत’ला दिली. राज्यात वाशिम, हिंगोली, परभणी आणि बुलडाणा या चार जिल्ह्यांत प्रामुख्याने बीजोत्पादन कार्यक्रम घेण्यात येतो. येथील हवामान व परिस्थितीत पोषक असल्याने बुलडाणा जिल्हा हा बीजोत्पादन कार्यक्रमात आघाडीवर आहे.
भाजीपाला बीजोत्पादनातही योगदान
अलीकडील काळात जिल्ह्यात बागायती क्षेत्र वाढले असून, १७ हेक्टरवर कांदा बीजोत्पादन, संकरित भेंडी, दुधी भोपळा, शिरे दोडका व चोपडा दोडका यांसह अन्य भाजीपाला पिकांचे बीजोत्पादन केले जाते. प्रामुख्याने देऊळगावराजा, सिंदखेडराजा या तालुक्यांत ते होते.