खामगाव : बुलडाणा जिल्ह्यातील धान्य वाहतूक अनियमिततेप्रकरणी जिल्हा पुरवठा अधिकारी बी.यु.काळे यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले आहे. तर त्यांच्या जागी सहा.जिल्हा पुरवठा अधिकारी रूपेश खंडारे यांना प्रभारी पदभार देण्यात आला आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी एका आदेशान्वये ही कारवाई केली आहे. मात्र, रुपेश खंडारे यांची इच्छा नसतानाही त्यांना हा पदभार देण्यात आल्याचे समजते.
बुलडाणा जिल्ह्यातील धान्य वाहतूक भ्रष्टाचार आणि अनियमिता प्रकरण चांगलेच गाजत असताना, २० जुलै रोजी विभागीय आयुक्त पियुष सिंह यांनी तडकाफडकी आदेश पारीत करून जिल्हा पुरवठा अधिकारी बी.यु.काळे यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यानुसार जिल्हाधिकारी निरूपमा डांगे यांनी पुढील कारवाई करीत जिल्हा पुरवठा अधिकारी बी.यु.काळे यांना सक्तीच्या रजेवर पाठविले. त्यांच्या जागी सहा.जिल्हा पुरवठा अधिकारी रूपेश खंडारे यांना जिल्हा पुरवठा अधिकारी म्हणून प्रभार देण्यात आला आहे. जिल्हा पुरवठा अधिकारी बी.यू. काळे यांच्या कार्यकाळात धान्य वाहतुकीत अनियमितता झाल्याची विविध प्रकरणं समोर आली. त्यासोबतच भ्रष्टाचारामुळे ९ चौकशी, दोन मंत्रालय स्तरावरील चौकशीमुळे जिल्हा पुरवठा कार्यालयाच्या अनागोंदी कारभार मंत्रालय स्तरावर पोहोचला आहे. त्यामुळे काळे यांच्या कार्यकाळातील ‘घोळ’ निस्तारण्यातच खंडारे यांना बराच वेळ द्यावा लागेल, या धास्तीमुळे जिल्हा पुरवठा अधिकारी पदाचा प्रभार घेण्यास खंडारे काहीसे अनुत्सुक होते, अशी चर्चा दबक्या आवाजात जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालय वर्तुळात होत आहे.