बुलडाणा : वातावरणातील बदलामुळे जिल्ह्यात ताप, सर्दी, खोकल्याचे रुग्ण वाढले आहेत. येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दर दिवसाला पाचशेच्या जवळपास रुग्ण उपचारासाठी दाखल होत आहेत, तर याच तुलनेत बहुतांश रुग्ण खासगी रुग्णालयांमध्येही उपचार घेत असल्याने जिल्हा सामान्य रुग्णालयासह खासगी रुग्णालयांचीही ओपीडी फुल्ल असल्याचे चित्र आहे. ही बाब चिंताजनक असून, वेळीच योग्य उपाययोजना करणे गरजेचे आहे.
आधी पाऊस आणि आता त्यामध्ये खंड पडल्यामुळे वातावरणात बदल झाला आहे. ज्येष्ठांसह चिमुकल्यांत सर्दी, खोकला, तापाच्या तक्रारी वाढताहेत. यामुळे एकदमच ओपीडीमध्ये तिप्पट वाढ झाली आहे, तर सर्दी, खोकला, तापासह डेंग्यूचे रुग्ण वाढताहेत. आजार अंगावर काढू नका, वेळीच उपचार करून घ्या, तीन दिवसांपेक्षा जास्त दिवस सर्दी, खाेकला, ताप असल्यास काेराेना टेस्ट करून घ्या, असा सल्ला डाॅक्टर देत आहेत. एकीकडे व्हायरल इन्फेक्शनचा धाेका वाढला आहे. दुसरीकडे डेंग्यूने डाेके वर काढले आहे. जिल्हा हिवताप अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, जिल्ह्यात डेंग्यूचे १४७ संशयित रुग्ण आहेत. सर्दी, पडसे, खाेकल्याचेही दरराेज असंख्य नवे रुग्ण समाेर येताहेत. त्यात लहान मुले व ज्येष्ठांचे प्रमाण अधिक आहे.
अशी घ्या काळजी...
सर्दी, ताप, खोकल्याचा त्रास झाल्यास त्वरित डॉक्टरांकडे जाऊन तपासणी करावी. तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने कोरोनासंदर्भात संशय वाटल्यास टेस्ट करून घेणे गरजेचे आहे. पाणी उकळून किंवा ब्लिचिंग पावडर टाकून प्यावे, जेणे करून इतर आजार होणार नाहीत. दुखणे अंगावर काढणे आरोग्यासाठी बाधक ठरू शकते.
ओपीडीसह औषधालयाजवळ रांगाच रांगा
वातावरणातील बदलामुळे येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दर दिवसाला जवळपास ४५० च्या वर रुग्ण उपचारासाठी दाखल होत आहेत. एकच ओपीडी असलेल्या खिडकीजवळ रुग्णांच्या रांगाच रांगा दिसून येत आहेत, तर तपासणी केल्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार देण्यात आलेली औषधे घेण्यासाठीही औषधालयाजवळ रांगाच रांगा दिसून येत आहेत.
अशी आहे ओपीडी...
दिनांक ओपीडी संख्या २१ ऑगस्ट ३७९ २३ ऑगस्ट ७३१ २४ ऑगस्ट ५७१