वैनगंगा : नळगंगा नदीजोड योजनेअंतर्गत पैनगंगा नदी जोडण्याबाबत अहवाल अधीक्षक अभियंता अमरावती व पाटबंधारे प्रकल्प मंडळ अमरावती यांना सादर करण्यात आला आहे. त्यानुसार अहवालानुसार यामध्ये तीन पर्याय निवडण्यात आले आहे. माजी मंत्री भारत बोंद्रे यांनी या तीनही पर्यायांचा सखोल विचार व अभ्यास करून योग्य पर्याय शासनास सुचविला आहे. भारत बोंद्रे यांचा सिंचनाचा अभ्यास पाहता शासनाने त्यांनी सुचविलेल्या पर्यायाची तातडीने अंमलबजावणी करण्याची गरज आहे. पहिल्या पर्यायातंर्गत काटेपूर्णा प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रातून पेनटाकळी प्रकल्पाचा बांध असलेल्या नाल्याच्या ठिकाणी चार टप्प्यांमध्ये पाणी सोडण्याचा संकल्पीत प्रस्ताव आहे. ज्यांची किंमत सुमारे ५४७२.९२ कोटी आहे. त्याद्वारे बाधित होणारे वनक्षेत्र १३.९० कि.मी., तर एकूण नलिका लांबी ७७.१० कि.मी. आहे. दुसऱ्या पर्यायात काटेपूर्णा प्रकल्पातून निघणाऱ्या नदीजोड कालव्याचे सा. क्र. ३३९.२६ मि. व पेनटाकळी प्रकल्पामध्ये पाणी सोडणे ज्यांची एकूण किंमत अंदाजे ४६८२.०३ कोटी आहे, याद्वारे बाधित होणारे वनक्षेत्र ५.५० कि.मी., तर एकूण नलिका लांबी ५५.५० कि.मी. आहे. मात्र, यामध्ये एकूण पाणी उचल, तसेच बाधित होणारे वनक्षेत्र, तसेच नलिका लांबी जास्त आहे. या पर्यायची किंमत कमी असली तरी पेनटाकळी प्रकल्पाच्या बांधाजवळ पाणी सोडल्यामुळे बुलडाणा जिल्ह्यातील बराचसा भाग सिंचनापासून वंचित राहू शकतो. त्यामुळे अमरावती पाटबंधारे प्रकल्प मंडळाचे अधीक्षक अभियंता यांनी त्यांच्या अहवालात सुचविलेला तिसरा पर्याय योग्य असल्याचे मत भारत बोंद्रे यांनी मांडले आहे. या तिसऱ्या पर्यायानुसार एकूण किंमत अंदाजे ४८२०.३८ कोटी आहे. याद्वारे बाधित होणारे वनक्षेत्र पाच कि.मी., तर एकूण नलिका लांबी ३६.०० कि.मी.आहे. वैनगंगा - नळगंगा ते पैनगंगा हा नदीजोड प्रकल्प विदर्भाचे, तसेच मराठवाड्याचे वाटर ग्रीड होण्यासाठी पर्याय क्रमांक ३ अत्यंत योग्य असून, त्याद्वारे विदर्भातील सर्व जिल्हे जोडले जातील. पैनगंगा नदीत पेनटाकळी प्रकल्पाचे वरील बाजूस अंदाजे १० कि.मी.वर पाणी सोडल्यास विदर्भातील सर्व जिल्ह्यांचा समावेश यात होईल. हा सर्वाच्या हिताचा पर्याय असून, त्यास मान्यता देण्याची मागणी त्यांनी जलसंपदा मंत्र्यांकडे केली आहे. यावेळी त्यांच्या समवेत वल्लभराव देशमुख, शंतनू बोंद्रे, नंदू आंभोरे, रवी तांबट, रवी जाधव, शिवाजी वाघमारे, विलास वसू, अशोक पाटील उपस्थित होते.
नदीजोड योजनेत बंद नलिका प्रणालीद्वारे पेनटाकळी प्रकल्पापर्यंत पाणी वळवा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2021 4:34 AM