बुलडाणा: दिवाळीला सोमवारपासून सुरूवात होत आहे. त्यामुळे रविवार बाजार हा दिवाळी उत्सवसाच्या अनुषंगाने विशेष ठरला आहे. यावर्षी जिल्ह्यात दुष्काळ सदृश परिस्थिती असतानाही दिवाळीचा बाजारा मात्र ‘हाऊसफुल्ल’ दिसून येत आहे. प्रत्येक रविवारच्या बाजारात होणाºया गर्दीपेक्षा दिवाळीच्या या बाजारात सर्वाधिक गर्दी दिसून आली.जिल्ह्यातील अर्थचक्र हे पुर्णता शेतीवर अवलंबुन आहे. यावर्षी पावसाने हुलकावणी दिल्यामुळे शेतमालाच्या उत्पादनात मोठी घट आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात दुष्काळाची स्थिती असतानाही दिवाळीत होणाºया खरेदीवर ऐवढा परिणाम जाणवत नसल्याचे चित्र दिसून येत आहे. बुलडाण्यात रविवारला आठवडी बाजार भरतो. ५ नोव्हेंबरपासून दिवाळीचा उत्सव सुरू होत असून या दिवाळीसाठी रविवारचा बाजार महत्वाचा होता. रविवारच्या बाजारातील गर्दी पाहता दुष्काळाचा परिणाम जाणवला नाही. नेत्रदीपक आकाश कंदिल, आकर्षक पणत्या, फटाक्यांनी सजलेली दुकाने, पूजा साहित्याचे विशेष कीट, खतावणी व रोजमेळच्या वह्या तसेच दीपावलीच्या पृष्ठभूमीवर नानाविध साहित्याच्या खरेदीसाठी बालगोपाळांसह आबालवृद्धांची येथील बाजारपेठेमध्ये झुंबड उडाल्याचे पहावयास मिळत आहे. बुलडाणा येथील बाजारामध्ये केवळ शहरातीलच नव्हेतर तर ग्रामीण भागातूनही मोठ्या प्रमाणावर नागरिकांनी गर्दी केली होती. यावेळी बाजारपेठेत ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विक्रेत्यांकडून विविध योजना मांडण्यात आल्या आहेत. काहींनी ग्राहकांची धावपळ होऊ नये यासाठी एकाच छताखाली फराळापासून दिवाळीसाठी आवश्यक पूजा साहित्यांचे विशेष दिपावली कीट उपलब्ध करून दिले आहे. बाजारपेठेत फेरफटका मारल्यास चिनी मालाची निर्माण होऊ पाहणारी मक्तेदारी भारतीय साहित्याने मोडून काढल्याचे दिसत आहे. दिवाळीचे मुख्य आकर्षण असणारे आकाश कंदीलाचे अनेक प्रकार बाजारात दाखल झाले आहेत. आकाश कंदिलांनी वेधले लक्षबाजारामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आकाश कंदिल विक्रीला आले आहेत. यामध्ये वेगवेगळ्या आकाराचे व रंगाचे आकाश कंदिल लक्ष वेधत आहेत. कागदी आकाश कंदिलामध्ये घुमट, चौकोनी, गोलाकार, दिवा असे प्रकार आहेत. तर प्लास्टिकद्वारे तयार केलेला फायर बॉल ही अनेकांचे लक्ष वेधुन घेत आहे. जुन्या चांदणी आकारातील आकाश कंदील ५० रुपयांपासून ४०० रुपयांपर्यंत आहेत. चिनी लाइटींगचा झगमगाटचिनी लाइटींग जवळपास ४० रुपयांपासून विक्रीसाठी आलेली आहे. सजावटीसाठी वापरण्यात येणारे लहान आकारातील आकाश दिव्यांच्या माळांची ४० रुपये डझन या दराने विक्री होत आहे. पणत्यांमध्ये नेहमीच्या मातीच्या साध्या पणत्या १० ते २० रुपये डझन आहेत. कुंदन वर्क, रंगीत टिकली वर्क, सिरॅमिक वर्क असणाºया पणत्या प्रती नग २० रुपयांपासून ५० रुपयांपर्यंत आहे.
दुष्काळी परिस्थितीतही दिवाळीचा बाजार ‘हाऊसफुल्ल’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 04, 2018 5:53 PM