- ब्रह्मानंद जाधव लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: सेंद्रीय शेती करण्यासाठी कृषी विभागाकडून विविध उपक्रम राबविण्यात येतात. मात्र शेतकऱ्यांकडून पाहिज्या त्या प्रमाणात त्याला प्रतिसाद मिळत नाही. परंतू मेहकर तालुक्यातील अंत्री देशमुख येथील महिला याला अपवाद ठरल्या आहेत. येथील स्त्री शक्तीने सेंद्रीय शेतीची कास धरून शेतातच परसबाग बहरवली. ज्ञानेश्वरी, माऊली, झाशीची राणी, सावता माळी अशा वेगवेगळ्या नावांनी समुह तयार करून प्रत्येक महिलेने आपल्या शेतातच भाजीपाला लागवडीचा नावीण्यपूर्ण प्रयोग सुरू केला आहे.परसबाग म्हटलं की, प्रत्येकाला आठवते जाई, जुई, मोगरा, झेंडू, गुलाब यासारख्या नानाविध फुलझाडांचा बगीचा. परंतू अंत्री देशमुख येथील महिलांनी या परसबागेचे चित्रच बदलून टाकले आहे. बचत गटाच्या माध्यमातून महिलांनी एकत्र येऊन वेगवेगळे समुह तयार केले. त्या समुहांना माऊली, कन्हैया, ज्ञानेश्वरी, सावता माळी, झाशीची राणी असे नावे दिले. या समुहाच्या माध्यमातून प्रत्येक महिलेने आपल्या शेतातच एक गुंठा क्षेत्रावर परसबाग तयार केली. या परसबागेमध्ये कुठलेही फुलझाडे न लावता भाजीपाला लागवडीचा एक वेगळा प्रयोग राबविण्यात आला आहे.महिन्या भरापासून परिश्रम घेत या महिलांनी फुलवलेली परसबाग संर्वांचेच लक्ष वेधत आहे. बागेत वळोवेळी पाणी देणे, भाजीपाल्याची काळजी घेणे, अशी मेहनत महिला दिवस रात्र करीत आहेत. सेंद्रिय पध्दतीने सर्व भाजीपाल्याची लागवड करण्यात आली आहे. त्यामुळे हा भाजीपाला आरोग्यासाठी उत्तम आहे.महिलांचा पुढाकारअंत्री देशमुख येथील महिलांनी स्वयंस्फुर्तीने पुढाकार घेऊन परसबागेच्या माध्यमातून भाजीपाला लागवडीचा अनोखा उपक्रम सुरू केला आहे. माऊली समुहातील अर्चना ज्ञानेश्वर देशमुख, कन्हैया समुहातील मिरा देविदास देशमुख, विमल लक्ष्मण पुंड, ज्ञानेश्वरी समुहातील शारदा संजय देशमुख, सावतामाळी समुहातील अंजली प्रदिप देशमुख, झाशीची राणी समुहातील कृषीसखी वर्षा खुशालराव देशमुख यांनी महिलांनी परसबागेत भाजीपाला लागवड केली आहे. प्रत्येकाची परसबाग वेगवेगळ्या ठिकाणी आहे. या उपक्रमाचा आदर्श घेऊन इतर महिलाही आता परसबाग करण्याची तयारी करीत आहेत.
ज्ञानेश्वरी, माऊली बचत गटांनी फुलवली परसबाग!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2019 4:05 PM