महारचिकना : महावितरणकडून सध्या शेतकऱ्यांच्या कृषी पंपाचा वीज पुरवठा खंडित करण्यात येत आहे. लोणार तालुक्यासह इतरही तालुक्यातील शेतकरी सध्या त्रस्त झाले आहेत. अवकाळी पाऊस असो किवा गारपीट यात शेतकरीवर्ग आर्थिक संकटात सापडला असताना महावितरणकडून वीज पुरवठा खंडित करण्यात येत आहे. महावितरणने कृषी पंपाचा वीज पुरवठा खंडित करू नये, अशी मागणी विनाेद वाघ यांनी केली आहे. मागणी मान्य न झाल्यास आंदाेलन करण्याचा इशारा दिला आहे.
लोणार तालुक्यातील बिबी परिसरातील शेतकऱ्यांनीही याबाबत आपले गाऱ्हाणे भाजपाचे युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष विनोद वाघ यांना सांगितले. याची दखल घेत विनोद वाघ यांनी २५ मार्च रोजी तात्काळ बिबी महावितरण कार्यालयामध्ये येऊन संबंधित अधिकाऱ्याला घेराव घालत धारेवर धरले. शेतकऱ्यांची कृषी पंपांचे कनेक्शन कापू नयेत, असा इशाराच वाघ यांनी दिला. यावेळी त्यांच्यासोबत भाजपाचे युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष देवानंद सानप, गजानन फड, श्रीराम मांटे, रामेश्वर काळुसे, रामा मुंढे, केशव डहाळकेसह चोरपांगरा, गोवर्धननगर, मांडवा, चिखला, किनगाव जट्टूसह अनेक गावातील शेतकरी उपस्थित होते.