--दुसऱ्या लाटेत लहान मुलेही बाधित--
सध्या सुरू असलेल्या दुसऱ्या लाटेत काही लहान मुलेही बाधित झाल्याचे समोर येत आहे. बुलडाण्यातील डॉक्टरांनी जवळपास ३० मुलांवर यासंदर्भाने इलाज केला आहे. अवघ्या पाच दिवसांच्या बाळालाही कोरोना झाल्याचे निदर्शनास आले आहे. दरम्यान, लहान मुलांना विलगीकरणात सांभाळणे हे एक कठीण काम ठरू शकते.
--पथक गठित करणार--
खासगी व शासकीय रुग्णालयांतील बालरोगतज्ज्ञ मिळून एक पथक गठित करण्याच्या जिल्हास्तरावर हालचाली सुरू झाल्या आहेत. शासकीय रुग्णालयांतर्गत जवळपास ७ बालरोगतज्ज्ञ आहेत. त्यांचेही आरोग्य प्रशासन याकामी सहकार्य घेत आहे. सध्या हे पथक गठित करण्याची प्रक्रिया प्राथमिक स्तरावर आहे. सोबतच खासगी रुग्णालयातील एका महिला बालरोगतज्ज्ञाचीही आरोग्य विभाग याकामी मदत घेऊन त्यांचे मार्गदर्शन घेणार असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.
--बालरुग्णांसाठी २० खाटांचा स्वतंत्र कक्ष--
कोविड समर्पित रुग्णालयांमध्ये वर्तमान स्थितीत २० खाटांचा स्वतंत्र कक्ष उभारण्यात आला असून, ऑक्सिजन, व्हेंटिलेटरचीही त्यात सुविधा करण्यात आली आहे. यासोबतच पुढील टप्प्यात त्याची व्याप्ती वाढविण्यात येणार असल्याचे प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रशांत पाटील यांनी सांगितले.
--लहान मुलांमध्ये कोरोनाची लक्षणे काय?--
लहान मुलांमध्येही मोठ्या माणसाप्रमाणे तीव्र ताप येतो.
डोके दुखणे, खोकला, पडसे येणे.
कधी कधी संडास लागणे, वांती होणे, मळमळ होणे अशी लक्षणे असतात.
क्वचित प्रसंगी लहान मुलांची प्रकृती गुंतागुंतीचे होते. लहान मुलांना कोरोना होण्याचे कारण प्रसंगी कुटुंबाला कोरोना झाल्याचा इतिहास असणेही असते. लहान मुलांमध्येही साधारण, मध्यम व प्रसंगी मॉडरेट लक्षणे आढळून येतात. त्यानुसार ट्रीटमेंटमध्ये बदल केला जातो.
--कोट--
ताप येणे, डोके, पोट दुखणे क्वचित प्रसंगी संडास लागणे, मळमळ होणे, वांती होणे अशी लक्षणे लहान मुलांमध्ये आढळून येतात. लहान मुलांची कोरोना चाचणीही पालकांनी न घाबरता करावी. ती त्रासदायक नसते.
(डॉ. राजेंद्र बेदमुथा, बालरोगतज्ज्ञ, बुलडाणा)