शेगाव ( जि. बुलडाणा): आम्हाला पुनर्वसन नको, कुठल्याही परिस्थितीत जागा सोडणार नाही या मागणीसाठी गुरुवारी शेगावात मोर्चा काढण्यात आला. यावेळी विभागीय आयुक्त ज्ञानेश्वर राजूरकर, जिल्हाधिकारी किरण कुरुंदकर यांची शिष्टमंडळाने भेट घेऊन आपले आक्षेप नोंदविले. शेगावच्या विकासासाठी शासनाने ४९६.४0 कोटी रूपयांचा विकास आराखडा तयार केला आहे. या आराखड्यामधील १00 कोटी रूपयांची कामे पूर्ण झाली असून काही कामे प्रगतीपथावर आहेत. याच अंतर्गत खळवाडी परिसरातील रामदेव बाबा नगर, दौलतपुरा, कुरैशी मोहल्ला, मातंगपुरा, बालाजी फैल, सिंधी कॉलनी येथील वस्तींचेही पुनर्वसनाचा आराखड्यात समावेश आहे. सन २0१0 साली मंजूर या कामाला उशीर होत आहे म्हणून उच्च न्यायालयाने मागील महिन्यात खळवाडीबाबत तत्काळ कार्यवाहीचे निर्देशित केले होते. त्यानुसार खळवाडीतील एकूण १२ एकरातील रहिवाश्यांना अकोट रोडवरील गजानन महाराज संस्थानच्या ६ एकरातील शेतात हलविण्याबाबत कारवाईला वेग आला आहे. दरम्यान फक्त वाहन पार्कींगच्या नावाखाली आम्हाला गावाबाहेर हाकलून चालणार नाही. आम्हाला पुनर्वसन नको, कुठल्याही परिस्थितीत जागा सोडणार नाही या मागणीसाठी गुरुवारी विश्राम भवनावर आयोजित आयुक्त ज्ञानेश्वर राजूरकर यांच्या बैठकीवर मोर्चा काढण्यात आला. आंबेडकर चौक येथून ३00 च्या जवळपास नागरिकांनी या मोर्चात सहभाग घेतला. पोलिसांनी सदर मोर्चा रेल्वे स्थानकासमोर थांबवून ५ नागरीकांचा समावेश असलेल्या शिष्टमंडळाला आयुक्तांना भेटण्याची परवानगी दिली. यामध्ये डॉ. रवींद्र कलोरे, हाजी वजीर, डी.के.शेगोकार, करण पिवाल, संतोष गोरले यांनी आयुक्त ज्ञानेश्वर राजूरकर, जिल्हाधिकारी किरण कुरुंदकर, यांच्याशी चर्चा केली. मागण्यांची दखल घेतल्या जाईल असे आश्वासन यावेळी देण्यात आले.
खळवाडी परिसराचे पुनर्वसन नको!
By admin | Published: August 14, 2015 12:09 AM