- अनिल गवई लोकमत न्यूज नेटवर्क खामगाव : सृष्टीचा निर्माता भगवंत असून सर्वकाही इच्छीत देण्याचे सामर्थ्य भगवंतांतच आहे. त्यामुळे भगवंत प्राप्त करण्यासाठीच प्रत्येकाची प्रबळ इच्छाशक्ती असली पाहीजे. भगवंतापासून काही प्राप्त करण्याची मनिषा ठेवण्याऐवजी भगवंतालाच प्राप्त करण्याची मनिषा प्रत्येकाने ठेवावी. कटनी मध्यप्रदेश येथील ब्रम्हकुमारी केंद्राच्या राजयोगीनी ब्रम्हकुमारी भारती दीदी यांच्याशी साधलेला संवाद...
मनुष्याच्या दु:खाची कारणे कोणती? मनाच्या विपरीत घडलं की, साध्या साध्या गोष्टीने प्रत्येक मनुष्य निराश होतो. जे करायचे ते सोडून, नको असलेल्या कामातच तो अधिक रमतो. त्यामुळे आजच्या समाजातील मनुष्य दु:खी आहे. रिकामे ‘मन’ हे सुद्धा मनुष्याच्या दु:खाचे प्रमुख कारण आहे.
तणाव विरहित समाजाच्या निर्मितीसाठी काय सांगाल?अपेक्षा आणि इच्छा वाढीस लागल्याने मनुष्य नैराश्य आणि तणावाकडे जात आहे. ही वस्तुस्थिती आहे. मात्र, प्रत्येकाने आपल्या जीवनात प्रेम...आदर आणि नि:स्वार्थ भावनेची देवाण-घेवाण केल्यास, निकोप समाजाची निर्मिती सहज शक्य आहे. आपल्यातील अहंकार आणि सर्व विकारांना शत्रु मानण्यात येते. अंगी असलेले विविध विकार हे शत्रु असले तरी, जीवनात माणसाचा कुणीही शत्रु नसला पाहीजे. विकारांचा त्याग केल्यास मनुष्य सुखी होईल आणि पर्यायाने तणावमुक्त समाजाची निर्मिती होण्यास मदत होईल.
ब्रम्हकुमारीज्मुळे मनुष्याच्या जीवनात बदल घडतात का?निश्चितच, ब्रम्हकुमारी विश्वविद्यालयाशी आपण वयाच्या १३ व्या वर्षीपासून जुळलो आहोत. माझ्यासह अनेकांच्या आयुष्यात ब्रम्हकुमारीजमुळे आमुलाग्र बदल घडून आले आहेत. अनेकांना क्रोधावर नियत्रंणही मिळविण्यास मदत झाली आहे.अंहकार हा मानवाचा सर्वातमोठा शत्रू आहे. शास्त्राने अंहकाराला दुराचारी कंसाची उपमा दिली आहे. सुख आणि समाधान प्राप्तीसाठी स्वार्थाला दूर ठेवले पाहीजे. तसेच प्रत्येकाने जीवनातील अंहकाररूपी कंसालाही प्रत्येकाने दूर ठेवण्याचा प्रयत्न करणे, आणि इतरांना यासाठी प्रवृत्त करणे आवश्यक आहे.
तणाव विरहित समाज निर्मितीसाठी ब्रम्हकुमारीचे योगदान काय?तणाव विरहित समाजाच्या निर्मितीसाठी प्रजापिता ब्रम्हकुमारी विश्व विद्यालयाकडून भारतातच नव्हे तर संपूर्ण विश्वात प्रयत्न केले जात आहेत. जगभरात ८५०० केंद्रांच्या माध्यमातून विविध ठिकाणी तणावमुक्त शिबिर, प्रबोधन कार्यशाळा तसेच इतर धार्मिक कार्यक्रम राबविण्यात येतात. राजस्थान येथील माउंट आबू येथून प्रत्येक केंद्र संचालित केले जाते. महाराष्ट्र, मध्यप्रदेश, कर्नाटक, उत्तरप्रदेश यासारख्या प्रमुख राज्यातही ब्रम्हकुमारीजचे मोठे योगदान आहे.