- देवेंद्र ठाकरेलोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: एकीकडे अनेक धडधाकट तरूण मतदानाबाबत पाहिजे तेवढे गंभीर नसताना, दुसरीकडे खामगाव शहरासह संपुर्ण विधानसभा मतदारसंघात अनेक दिव्यांग बांधवांनी स्वत: मतदान करत एक आदर्श प्रस्थापित केला. मतदान हेच लोकशाहीचे बळ असून त्याकडेच पाठ फिरवून लोकशाही लुळी, पांगळी करू नका, असे भावनिक आवाहनच यानिमित्ताने त्यांनी केल्याचे दिसून आले.सध्या सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीचा रणसंग्राम सुरू आहे. यात गुरूवारी सकाळपासून महाराष्ट्रात १० लोकसभा मतदारसंघात मतदानाला सुरूवात झाली. त्यानुषंगाने बुलडाणा लोकसभा मतदारसंघात दिव्यांग मतदात्यांचा उत्साह पाहायला मिळाला. विशेष करून खामगाव शहर व तालुक्यातील मतदान केंद्रांवर दिव्यांग बांधवांचा मतदानाबाबत उत्साह वाखाणण्याजोगा होता. खामगाव शहरातील शाळा क्रमांक ९ मध्ये मतदान केंद्र १७३ वर सकाळी १०.३० वाजता अरूण देशमुख हे दिव्यांग मतदार मतदान करायला आले. त्यांचे दोन्ही पाय पोलिओमुळे निकामी झाले आहेत. असे असतानाही त्यांचा मतदानाबाबतचा उत्साह कमालीचा आहे. त्यांनी मतदानाचा आग्रह धरला. त्यामुळे त्यांच्या कुटूंबियांनी तसेच स्वयंसेवकांनी त्यांना मतदान केंद्रापर्यंत पोहचवले. मतदानाचा हक्क बजावून केंद्राबाहेर आल्यानंतर त्यांनी सर्वांनाच मतदान करण्याचे आवाहन केले. (प्रतिनिधी)
खामगाव विधानसभा मतदारसंघात ९७४ मतदार!खामगाव विधानसभा मतदारसंघात एकूण ९७४ दिव्यांग मतदार आहेत. यापैकी खामगाव शहरातील दिव्यांग मतदारांची संख्या १२४ एवढी आहे. दुपारी सुमारे साडेबारा वाजेपर्यंत खामगाव शहरात ४६ दिव्यांग मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
‘विराट’, स्वयंसेवकांनी दिले ‘बळ’!खामगाव शहरात दिव्यांग बांधवांना मतदान केंद्रापर्यंत पोहचविण्यासाठी विराट दिव्यांग फाऊंडेशनचे मनोज नगरनाईक यांच्यासह पदाधिकाºयांनी मदत केली. याशिवाय प्रत्येक मतदान केंद्रावर विशेष स्वयंसेवकांचीही नियुक्ती करण्यात आली आहे. दिव्यांग मतदारांमध्ये मतदानाबाबत उत्साह दिसून येत आहे.
लोकशाही मजबूत करण्यासाठी मतदान हा एकमेव मार्ग आहे. हा हक्क प्रत्येकानेच बजावावा. मतदानाकडे कानाडोळा करून ही व्यवस्था अधु करण्याचा प्रयत्न कोणीही करू नये. - अरूण देशमुख, दिव्यांग मतदार, अभय नगर खामगाव.