शेती व्यवसाय हा अंग मेहनत करणाऱ्या मजुरांवर अवलंबून आहे; मात्र अलीकडे काही वर्षांत मजुरांची संख्या घटल्यामुळे शेतात काम करण्यासाठी मजूर मिळणे अवघड झाल्याने शेतकरी अनेक कामे यंत्राच्या साह्याने करत आहेत. पेरणीपूर्वी शेती मशागतीपासून पीक लागवड करणे, खुरपणी करणे, पिकाची काढणी करणे, मळणी, यांसह फळपिकांची तोडणी, फवारणी, पाणी देणे, अशा सर्व कामांसाठी मजुरांची गरज भासते. शेतकरी कुटुंब छोटे असल्यामुळे सर्व कामे घरी करणे शक्य नसते. मजुरी करणाऱ्यांचा शोध घेऊन कामे करून घ्यावी लागतात. सोयाबीन सोंगणीसाठी जिल्ह्यात परजिल्ह्यातून मजूर येतात.
शेतीच्या कामात यांत्रिकीकरण झाले तरी मजूर लागणार आहेतच. परिसरात सोयाबीन सोंगणीचा हंगाम एकाच वेळेस येतो; तेव्हा सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मजूर मिळणे कठिण होते. सध्या तुरीची सोंगणी सुरू असून, मजुरांची मजुरी वाढवूनही मजूर मिळत नाहीत.
- गजानन पवार, शेतकरी.
अनेक मजूर हे कमी वेळात जास्त पैसे मिळणारे काम शोधतात. कोरडवाहू शेतात मजुरांना वर्षभर पुरेल एवढे काम राहत नाही, केवळ हंगामामध्येच ते काम येते. त्यामुळे अनेक मजूर शहराच्या ठिकाणी गेले आहेत. काही मजूर बांधकामाकडे वळले आहेत.
- संतोष लाटे, शेतकरी.
शेतामधील अनेक कामे हे यंत्राच्या साह्याने होत असली तरी काही कामांसाठी मजुरांचीच गरज लागते. कामांमध्ये तण वाढल्यास त्यावर तणनाशक औषधांची फवारणी करता येईल. परंतु काही पिकांमध्ये फवारणी न करता निंदण करावे लागते, अशा कामांसाठी महिला मजूरच लागतात.
-प्रशांत इंगळे, शेतकरी.
यंत्राने होणारी कामे
नांगरणी, रोटाव्हेटर, पेरणी, फवारणी, मळणी, कोळपणी, गहू काढणे यांसारखी अनेक कामे आता यंत्राद्वारे होत आहेत.
कृषी यंत्रांनी घेतली मजुरांची जागा
पारंपरिक पद्धतीने शेतात कामे न करता बहुतांश कामे यंत्राच्या साह्याने केली जात आहेत. अनेक शेतकरी प्रयोगशील झाले आहेत. बैलजोडीऐवजी शेतकरी आता ट्रॅक्टरचा सर्रास वापर करत आहेत. ट्रॅक्टरद्वारे शेतातील नांगरणी, पेरणी, कोळपणी आणि फवारणी अशी विविध कामे होत आहेत.