मेहकर: प्रसुतीपूर्व गर्भलिंग निदान करणे तथा सोनोग्राफी सेंटरवरील दस्ताऐवजात अनियमिता ठेवल्याप्रकरणी डोणगाव येथील डॉ. संजय धाडकर यास मेहकर प्रथमवर्ग न्यायालयाने ११ महिन्याचा कारावास आणि तीस हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.गेल्या दोन वर्षापूर्वी २०१८ मध्ये वैद्यकीय अधीक्षक डॉ. स्वाती रावते यांनी डोणगाव येथील सोनोग्राफी सेंटरची तपासणी केली असता तेथे त्यांना अनेक अनियमितता आढळून आल्या होत्या. नोंदणी कार्डही तेथे आढळून आले नव्हते. प्रकरणी त्यांनी सोनोग्राफी मशीन सील करून रितसर तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पोलिस तपासात या प्रकरणात दोषारोपपत्र न्यायालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर हे प्रकरण मेहकर येथील प्रथमवर्ग न्यायालयात हे प्रकरण सुनावणीसाठी आले. सुनावणी दरम्यान उभय बाजूंचे युक्तीवादही झाले. दरम्यान, प्रकरणात सहाय्यक सरकारी अभियोक्ता लाली खन्ना यांचा युक्तीवाद न्यायालयाने ग्राह्य धरत डॉ. संजय धाडकर यांना प्रसुती पूर्व गर्भलिंग निदान प्रतिबंध कायद्याच विविध कलमांचा आधार घेत तीस हजार रुपये दंड व ११ महिन्याचा कारावास अशी शिक्षा सुनावली. या निकालामुळे मेहकर तालुक्यातील डॉक्टरांमध्ये खळबळ उडाली आहे. २०१८ मधील हे प्रकरण त्यावेळी बुलडाणा जिल्ह्यात चांगलेच गाजले होते. डॉ. संजय धाडकर यांच्या दत्तात्रय हॉस्पीटल व सिंधू मॅर्टनिटी होमध्ये कथितस्तरावर अवैध गर्भपात होत असल्याच्या तक्रारी मिळाल्यानंतर वैद्यकीय अधीक्षक स्वाती रावते यांनी तेथे ही कारवाई केली होती. या प्रकरणात सरकारी अभियोक्ता लाली खन्ना यांना सकरारी अभियोक्ता सुधीर डोंगरदिवे यांच्या महत्त्वपूर्ण सहकार्य मिळाले. (शहर प्रतिनिधी)
गर्भलिंग निदान प्रकरणी डोणगावच्या डॉक्टरला ११ महिने कारावास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2020 10:59 AM