खामगाव (बुलडाणा) : राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या विरोधात 2 जानेवारीला खामगाव, नांदुरा व जळगाव जामोद तालुक्यात आयएमएने बंद पाळला आहे. अत्यावश्यक सेवा वगळता इतर कामावर बहिष्कार टाकत शासनाच्या या धोरणाचा डॉक्टरांनी काळ्या फिती लावून निषेध नोंदविला. राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाचे विधेयक संसदेत पारित होत आहे. वर्तमान स्थितीतील विधेयकाला आयएमएने विरोध दर्शवला आहे. देशभर पुकारण्यात आलेल्या या आंदोलनात खामगाव आयएमए विभागसुद्धा सहभागी झाला आहे.
विभागातील १३८ डॉक्टर्स या आंदोलनात सहभागी झाले. सकाळपासूनच डॉक्टरांनी बंद पुकारल्याने ओपीडीवर परिणाम झाला. मात्र अत्यावश्यक सेवा सुरु ठेवण्यात आल्या होत्या. आयएमए अध्यक्ष डॉ. निलेश टापरे यांच्या नेतृत्वात मंगळवारी दुपारी १२ वाजता उपविभागीय अधिकारी यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. यावेळी सचिव डॉ. गुरुप्रसाद थेटे, डॉ. विनोद राजनकर, डॉ. बावस्कर, डॉ. गायकवाड आदींची उपस्थिती होती.
का आहे विधेयकाला विरोध ?१. हे विधेयक खासगी व्यवस्थापनाच्या सोईचे आहे. ज्यामुळे भ्रष्टाचार वाढेल.२. वैद्यकीय महाविद्यालयाच्या फीवर ४० टक्क्यांपर्यंत जागावर शासनाचा निर्बंध राहील. ६० टक्के जागांबद्दल व्यवस्थापनाला अधिकार राहील. फी भरमसाठ वाढवण्यात येईल. ३. दंडाद्वारे आकारण्यात येणारी रक्कम ५ कोटी १०० कोटी राहू शकते. ज्यामुळे भ्रष्टाचाराला वाव आहे. ४. आयोगात फक्त ५ राज्यांचे प्रतिनिधित्व राहील. उर्वरीत २५ राज्ये दुर्लक्षित राहतील.