आरटीओचा कारभार दिवसेंदिवस ऑनलाईन होत आहे. सोबतच आरटीओ कार्यालय एजंटमुक्त करायचे असेल तर अशा नवनवीन कल्पना राबवाव्याच लागणार आहेत. जिल्ह्यात दरवर्षी लाखाच्या जवळपास वाहन चालकांचे लर्निंग लायसन्ससाठी अर्ज येतात. लायसन्ससाठी ४० वर्षांपुढील व्यक्तींना डॉक्टरांचे फिटनेस प्रमाणपत्र जोडणे बंधनकारक आहे. तेही आता एमबीबीएस डॉक्टरांचे ऑनलाईन प्रमाणपत्र ग्राह्य धरले जाणार आहे. यासाठी डॉक्टरांना नोंदणी क्रमांक दिला जाणार आहे. यामुळे नागरिकांचा त्रास वाचणार असून, चिरीमिरीला आळा बसणार आहे.
लर्निंग लायसन्स ऑनलाईन
परिवहन विभागाच्या ऑनलाईन प्रक्रियेमुळे आता शिकाऊ वाहनचालक परवाना आणि नवीन वाहनांची नोंदणी प्रक्रिया अधिक सोपी होणार आहे. मात्र, ऑनलाईन लर्निंग लायसन्स मिळवण्यासाठी आपला मोबाईल क्रमांक आधार क्रमांकाशी लिंक असणे आवश्यक आहे. याशिवाय परिवहन विभागाच्या इतरही अनेक सुविधा ऑनलाईन उपलब्ध करून देता येणार आहेत. दररोज ३०० ते ४०० ते ५०० लर्निंग लायसन्स दिले जात असल्याची माहिती आहे.
किती वयापर्यंत मिळते लायसन्स?
वयाच्या कोणत्याही वर्षापर्यंत वाहन चालविण्याचा परवाना काढू शकतो. केवळ फिटनेस आणि नजर चांगली असणे आवश्यक आहे. याबाबत कुठलाही असा नियम नाही, अशीही माहिती उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी दिली.
डाॅक्टरांना नसणार बंधन
वाहन परवाना मिळविण्यासाठी लागणारे एमबीबीएस डॉक्टरांचे प्रमाणपत्र अनिवार्य करण्यात आले आहे. मात्र, डॉक्टरांनी एका दिवसात किती प्रमाणपत्र दिले पाहिजे याला अद्याप तरी बंधन नसल्याची माहिती उप प्रादेशिक परिवहन विभागाच्यावतीने देण्यात आली आहे. याबाबत बंधन येणार आहेत. मात्र, हा निर्णय वरिष्ठ पातळीवर होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
सध्या आरटीओ विभाग ऑनलाईन प्रणालीकडे वळली आहे. यामुळे नागरिकांचा फायदा तर होणारच आहे सोबतच वेळ आणि श्रमाची बचत होणार आहे.
-जयश्री दुतोंडे, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, बुलडाणा.