धामणगाव धाड : धामणगावसह परिसरातील अनेक गावात गत काही दिवसांपासून मोकाट कुत्र्यांना चर्मरोगाची लागण झाली आहे. हे खरूजसदृृृृश जखमांनी माखलेले मोकाट कुत्रे गावातील परिसरात सैरावैरा फिरत असल्याने सर्वत्र दुर्गंधी पसरत आहे. त्यापासून संसर्ग होण्याची भीती व्यक्त होत आहे. या कुत्र्यांचा बंदाेबस्त करण्याची मागणी हाेत आहे. मार्च महिन्यापासून ग्रामीण भागात काेराेनाचा प्रार्दुभाव वाढला आहे. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यातच धामणगावसह परिसरातील अनेक गावांमध्ये मोकाट कुत्र्यांच्या अंगावरील केस गळती होऊन संपूर्ण अंगावर जखमा झाल्याचे आढळून येत आहे. जखमांनी माखलेले हे मोकाट कुत्रे परिसरात सैरावैरा धावत असताना अनेक नागरिकांच्या घरामध्ये प्रवेश करतात. कुत्र्यांच्या अंगावरील जखमांमधून रक्तस्त्राव होत असल्याने सर्वत्र दुर्गधी पसरत आहे. चर्मरोगाची लागण झालेल्या कुत्र्यांपासून वयोवृद्ध लोकांना व लहान मुलांना धोका निर्माण झाला आहे. मोकाट कुत्र्यांच्या या संसर्गापासून परिसरातील मानवी आरोग्य धोक्यात येण्याची चिंता सध्या नागरिकात वाढली आहे. या बाबीकडे ग्रामपंचायत प्रशासनाने अशा कुत्र्यांचा बंदाेबस्त करण्याची मागणी हाेत आहे.
काेट
काही मोकाट कुत्र्यांना स्कॅबीजा व एक्झिमा हा आजार झाला आहे. हा आजार असून संसर्गजन्य आहे. त्यावर उपचार असून, आजारासंबंधित औषध पशुवैद्यकीय दवाखाना मासरूळ येथे उपलब्ध आहे.
डाॅ. किशोर ज.शेळके, पशुधन पर्यवेक्षक पशुवैद्यकीय दवाखाना मासरूळ.