गावात पुन्हा पेटल्या चुली
ग्रामीण भागातील महिलांना चूल आणि धूरमुक्त करण्यासाठी केंद्र शासनाने उज्ज्वला योजनेंतर्गत गॅस सिलिंडरचे वाटप केले. त्यामुळे ग्रामीण भागातील महिला चुलीकडून गॅस सिलिंडरकडे वळल्या होत्या.
मात्र मागील सहा महिन्यांपासून गॅस सिलिंडरच्या किमतीमध्ये सातत्याने वाढ होत असल्याने ते सर्वसामान्यांच्या आवाक्याच्या बाहेर गेले आहे. सुरुवातीला ४०० रुपयांना मिळणाऱ्या गॅस सिलिंडरसाठी ग्राहकांना आता ९०० रुपये मोजावे लागत आहेत. त्यामुळे अनेकांनी गॅस सिलिंडरचा वापर बंद करीत पुन्हा चुलीकडे मोर्चा वळविला आहे.
खर्च कसा भागवायचा?
कोरोनामुळे आधीच रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यातच कर्मचाऱ्यांच्या पगारातही कपात केली आहे. अशात पेट्रोल, डिझेलसह गॅस सिलिंडरच्या किमतीमध्ये सातत्याने वाढ केली जात आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचे जगणे कठीण झाले आहे. सुरुवातीला ४०० रुपयांना मिळणाऱ्या गॅस सिलिंडरसाठी आता ९०० रुपये मोजावे लागत आहेत.
यामुळे महिनाभराच्या खर्चाचा ताळमेळ जुळविताना चांगलीच दमछाक होत आहे.
- प्रशिता इंगळे, गृहिणी.
वाढत्या महागाईमुळे आधीच गृहिणींचे बजेट बिघडले आहे. त्यातच आता गॅस सिलिंडरच्या किमतींमध्ये सातत्याने वाढ केली जात असल्याने पुन्हा चुलीकडे वळण्याची वेळ आली आहे. उत्पन्न नसून महागाईत मात्र सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचे जगणे कठीण झाले आहे. केंद्र सरकारने किमान गॅस सिलिंडरच्या किमती कमी करण्याची गरज आहे.
- कोमल पवार, गृहिणी.
फेब्रुवारी महित्यात उच्चांकी वाढ
यंदा फेब्रुवारी महिन्यात गॅस सिलिंडरच्या किमतीमध्ये उच्चांकी वाढ झाली आहे. गॅस सिलिंडरच्या किंमती तब्बल ११० रुपयांनी वाढल्याने ६६४ रुपयांच्या सिलिंडरसाठी तब्बल ७६९ रुपये मोजावे लागले आहेत, त्यानंतरही दरवाढ कायम असल्याने अनेकांनी चुलीवर स्वयंपाक करण्यास सुरुवात केल्याचे चित्र आहे.