बुलडाणा : क्रीडानगरी बुलडाण्याचा आतापर्यंत राज्य तथा विभागीयस्तरावर सांघिक खेळ आणि ॲथलेटिक्समध्ये एक दबदबा निर्माण झालेला होता. मात्र २०२० च्या दशकात आर्चरी खेळाच्या माध्यमातून बुलडाण्याचा नावलौकिक वाढला असून गेल्या तीन ते चार वर्षात जागतिक स्तरावर झालेल्या आर्चरीच्या विविध स्पर्धांमध्ये बुलडाण्याला तब्बल तीन सुवर्ण आणि एक रजत आणि एक कांस्यपदक मिळालेले आहेत. त्यामुळे बुलडाणा शहर आणि जिल्हा आता आर्चरीची एक ताकद म्हणून पुढे येण्यास मोठा वाव निर्माण झाला आहे.आगामी दोन वर्षात कॉमनवेल्थ, एशियन गेम्स होऊ घातले आहेत. त्या पाठोपाठ आर्चरी वर्ल्डकप स्टेजेसलाही २०२३ मध्ये प्रारंभ होत आहे. परिणामी बुलडाण्यातील युवा खेळाडूंना गरजेनुरूप क्रीडाविषयक सुविधा उपलब्ध झाल्यास बुलडाण्याची ताकद या स्पर्धांमध्ये दिसू शकले. त्यानुषंगाने आता आर्चरीलाही एकप्रकारे राजाश्रयाची गरज निर्माण झाली आहे. ९ ते १५ ऑगस्ट दरम्यान पोलंडमधील वॉर्क्लेमध्ये झालेल्या युथ वर्ल्ड आर्चरी चॅम्पियनशिपमध्ये बुलडाण्याच्या मिहीर आपारने केलेल्या दमदार कामगिरीच्या जोरावर आपण अमेरिकेवर मात करत भारताला सुवर्णपदक मिळवून दिले. सोबतच मुलींच्या संघानेही याच पद्धतीने दमदार कामगिरी करत सुवर्ण पटकावले होते. त्या पार्श्वभूमीवर बुलडाण्याची आर्चरीमधील नेमकी ताकद काय? याचा मागोवा घेतला असता गेल्या तीन ते चार वर्षात बुलडाणा शहरातील खेळाडूंनी जागतिकस्तरावरील आर्चरीच्या स्पर्धांमध्ये तब्बल तीन सुवर्ण आणि एक रजत आणि एका कांस्य पदकाची कमाई केली आहे. पोलंडमध्ये मिहीरने सुवर्णपदकावर नाव कोरलेले असतानाच, त्याचाच सहकारी असलेल्या प्रथमेश जावकार यानेही यापूर्वी झालेल्या युथ वर्ल्ड आर्चरी चॅम्पियनशिपमध्ये रजत पदक पटकावले होते. या सर्वांवर कळस म्हणजे पोलिस दलात कार्यरत असलेल्या मोनाली जाधव हिने तर चीनच्या चेंगडू शहरामध्ये २०१९ मध्ये झालेल्या वर्ल्ड पोलिस गेममध्ये दोन सुवर्ण आणि एका कांस्यपदकाची कमाई केली होती. त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर गेल्या चार वर्षापासून बुलडाण्याच्या खेळाडूंचे नाव चमकत आहे.
--दहा वर्षांची मेहनत--
बुलडाण्याच्या या यशाच्या मागे माजी सैनिक तथा सध्या बुलडाणा पोलिस दलात कार्यरत असलेले चंद्रकांत इलग यांचे परिश्रम आहेत. २०१२ मध्ये त्यांनी बुलडाण्यातील खेळाडूंसाठी अकॅडमी सुरू केली. आत आजही ते ५० मुलांना मोफत प्रशिक्षण देत आहेत. आता हे खेळाडू आगामी तीन आंतरराष्ट्रीय स्पर्धांच्या तयारीत गुंतलेले आहेत.