अनिल गवई खामगाव (जि. बुलडाणा) : गेल्या आठवड्यापासून शहर आणि परिसरात ‘वाघा’च्या वास्तव्याच्या चर्चेने चांगलाच जोर पकडला आहे. शहरातील मानवी वस्त्या फिरून झाल्यानंतर शुक्रवारी रात्री पुन्हा घाटपुरी नाका परिसरात वाघ असल्याच्या चर्चेचे मोहोळ उठले. त्याचवेळी या भागात लग्नाची धामधूम सुरू होती. ऐन मुहूर्ताच्यावेळी वाघाची चर्चा पसरल्याने एका बंद खोलीत लग्न उरकण्यात आले. जेवणाच्या पंगतीही त्या एकाच खोलीत बसल्या. गेल्या आठ दिवसांपासून शहरातील कोणत्या ना कोणत्या भागात वाघ कुणाला तरी ‘दर्शन’ देत असल्याच्या चर्चेचे पेव फुटले आहे. मात्र, वनविभागाला काही वाघ गवसला नाही. त्यामुळे वाघाची भीती अधिकच गडद होत असून शुक्रवारी रात्री घाटपुरी नाका परिसरात वाघ असल्याची चर्चा वाऱ्यासारखी पसरली. त्यावेळी या परिसरात एका ठिकाणी लग्नाची धामधूम सुरू होती. वाघ दिसल्याच्या चर्चेने वन विभागाचे पथकही घटनास्थळी पोहोचले. हे बघून लग्नाची तयारी आणि वरातीचे रूपांतर क्षणात धावपळीत झाले. शेजाऱ्यांनी दिला आसरा अखेर वरिष्ठांनी पुढाकार घेऊन मोजक्याच नातेवाईकांच्या उपस्थितीत दहा बाय पंधरा फुटाच्या खोलीत लग्न लावले. अक्षता पडल्यानंतर तिथेच पंगतीही बसविण्यात आल्या. वऱ्हाड्यांना आसपासच्या शेजाऱ्यांनी आसरा दिला. वाघाच्या दहशतीमुळे बंद खोलीतील या लग्नाची आता एकच खमंग चर्चा परिसरात सुरू आहे.
वाघाच्या भीतीने घरातच शुभमंगल; जेवणाच्या पंगतीही एकाच खोलीत
By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2021 9:02 AM