लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : सद्या देशात नागरिकत्व सुधारणा कायद्यावरून शांतता भंग होण्याचे प्रसंग घडत आहेत. या कायद्याचे समर्थन आणि विरोध करताना सर्वप्रथम आपण देशाचे सुजान नागरिक आहोत. याची जाणिव असू द्यावी, असे भावनिक आवाहन जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांनी येथे केले.नागरिकत्व सुधारणा कायद्यावरून निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर खामगाव शहर पोलिस स्टेशनमध्ये आयोजित शांतता समितीच्या बैठकीत अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. सोमवारी रात्री झालेल्या या बैठकीला प्रमुख अतिथी म्हणून अप्पर पोलिस अधिक्षक डॉ. हेमराजसिंह राजपूत, उप विभागीय पोलिस अधिकारी प्रदीप पाटील यांची उपस्थिती होती. यावेळी पुढे बोलताना जिल्हा पोलिस अधिक्षक पाटील म्हणाले की, नागरिकत्व सुधारणा कायद्यावरून देशात, राज्यात आणि आपल्या परिसरात काही ठिकाणी शांतता भंग पावण्याचे प्रकार घडत आहेत. तात्विक विरोध करताना आपल्याच देशाच्या संपत्तीचे नुकसान करणे, योग्य नाही. लोकशाहीच्या सर्वोच्च मंदिराने पारीत केलेल्या कायद्याला रस्त्यावर उतरून विरोध करणे चुकीचे आहे. विरोधासाठी अनेक कायदेशीर मार्ग आहेत. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित होईल, असे कृत्य कुणीही करू नये, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. एखाद्या कायद्याच्या बाजूने अथवा विरोधात मतभेद असू शकतात. मात्र, यासाठी मनभेद होईल अशी कुणाचीही वागणूक असू नये, असे ते म्हणाले.संचालन शिवाजी नगर पोलिस स्टेशनचे निरिक्षक रविंद्र देशमुख यांनी केले. आभार शहर पोलिस स्टेशनचे निरिक्षक सुनील अंबुलकर यांनी मानले. या सभेला शहरातील शांतता कमेटी सदस्य विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि सामान्य नागरिकांची मोठ्यासंख्येने उपस्थिती होती.
सामाजिक सलोखा अबाधित ठेवा: मौलाना युनुसभारत आमचा देश आहे. भारताच्या पावन भूमीतच आमचा जन्म झाला आहे. भारताची माती आमच्यासाठी पवित्र आहे. त्यामुळे सामाजिक सलोख्याला ठेच पोहोचेल, असे कृत्य कुणीही करू नये आवाहन जुना फैल मशीदीचे मौलाना युनुस यांनी केले. यावेळी हकीमोद्दीन बोहरा, मौलाना इमरान खान, ज्येष्ठ पत्रकार राजेश राजोरे, प्रशांत देशमुख, अमोल अंधारे यांचीही समायोचित भाषणे झालीत. सर्वांनीचं शांततेचे आवाहन केले.