नगरपालिका प्रशासनाने शहरवासीयांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी जलजन्य आजाराविषयी जनजागृती सुरू केली आहे. पावसाळा संपेपर्यंत नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे. उघड्यावरील खाद्यपदार्थ खाल्ल्यामुळे आरोग्य बिघडण्याची शक्यता आहे. हॉटेलमधील खाद्यपदार्थांमुळेही पोटाचे विकार वाढण्याची शक्यता आहे. यामुळे नागरिकांनी शक्यतो बाहेरील खाद्यपदार्थ खाऊ नये. आरोग्याची काळजी घ्यावी. प्रकृती बिघडल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
पावसाळ्यात हे खायला हवे
घरी बनविलेले खाद्यपदार्थच खाण्यास पसंती द्यावी.
तुळस, आलं, पुदिना, हळद, हिंग, जिरे, कढीपत्ता यांचा आहारात समावेश असावा.
मेथीदाणे, कारले यांचा आहारात समावेश असावा.
व्हिटॅमीन सीयुक्त फळांचा आहारात समावेश असावा.
उकडलेले व भाजलेले अन्न खावे.
रस्त्यावरील अन्न नकोच
पावसाळ्यात कोणत्याही परिस्थितीमध्ये रस्त्यावरील वडापाव, भजी, चहा, छोले पुरी व इतर खाद्यपदार्थ खाऊ नयेत. या व्यवसायाच्या ठिकाणी स्वच्छता ठेवली जात नाही. दूषित पाणी वापरले जाण्याची शक्यता आहे. तेल व इतर पदार्थाचा दर्जाही चांगला नसतो. यामुळे उघड्यावरील खाद्यपदार्थ खाऊच नयेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
आहार तज्ज्ञ काय म्हणतात...
नगरपालिका प्रशासनाने अतिसार व जलजन्य आजारांविषयी जनजागृतीही सुरू केली आहे. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये पोटाचे आजार बळावतात. यामुळे नागरिकांनी आपल्या आहारावर विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. पचण्यास जड असणाऱ्या पदार्थांचे सेवन करू नये. शक्यतो घरात तयार केलेले पदार्थ खावे. बाहेरील विशेषत: रोडवरील खाद्यपदार्थ खाऊ नयेत, असे आवाहन उपजिल्हा सामान्य रुग्णालयातील आहारतज्ज्ञांच्यावतीने करण्यात आले आहे.
पावसाळ्यात हे खाऊ नये
कच्चे तळलेले, आंबवलेले पदार्थ खाणे टाळावे.
मिठाई, पनीर, मांसाहार शक्यतो टाळावा.
उघड्यावरील खाद्यपदार्थ खाऊ नये.
हॉटेलमधील खाद्यपदार्थही जास्त खाऊ नये.
स्वॉॅफ्ट ड्रिंक, थंड पेये, चायनीज पदार्थ खाऊ नयेत.