ओमप्रकाश देवकर
लोकमत न्यूज नेटवर्कहिवराआश्रम : जुन्या प्रथेप्रमाणे शक्यतो मुलीकडून लग्नात हुंडा स्विकारण्याची पद्धत आहे. मात्र याच प्रथेला तिलांजली देत लव्हाळा येथील युवकाने मुलीकडच्या नातलगांना आर्थिक सहाय्य करुन समाजापुढे एक आदर्श ठेवला आहे.मेहकर तालुक्यातील लव्हाळा येथे श्रीकृष्ण पवार हे आपल्या कुटूंबासह वास्तव्यास आहेत. घरी शेती नसल्याने शेतमजुरी करुनच उदरनिर्वाह करतात. यावर्षी त्यांच्या महिंद्र नावाच्या मुलाचा विवाह चिखली येथील रमेश पारधे यांची मुलगी रंजनासोबत ठरविण्यात आला होता. सर्व गोष्टी नियोजनाप्रमाणे ठरल्या. पत्रिका छापण्यात आल्या, बस्ता, भांडे सर्व खरेदी करण्यात आली. नवरी रंजनाचे वडील रमेश पारधे हे मजुरीचे काम करुन कुटूंबाचा उदरनिर्वाह करतात. परिस्थिती जेमतेम असल्याने व घर चालविताना होणारी दमछाक पाहून लग्न पैशाअभावी रद्द किंवा पुढच्या वर्षी करुन, असा निरोपच त्यांनी लव्हाळा येथील पवार यांना पाठविला. सदर निरोप येताच सर्वच जण चिंतातुर झाले. सदर विषय गावात माहित होताचअनेक जणांनी मदतीचा हात समोर केला. नवरदेव महिंद्र याने स्वत: जेथे कामाला आहे तेथून काही रक्कम उचलून त्यांनी चिखली येथे मुलीच्या घरच्यांना दिली व शेवटी ४ मे २०१७ ला सर्व नातलगांच्या साक्षीने विवाह संपन्न झाला.ग्रामपंचायत महिला सदस्यांनी केला नवरदेवाचा सत्कारनवरदेव महिंद्र पवार व वडील श्रीकृष्ण पवार यांनी आगळा वेगळा निर्णय घेवून समाजापुढे एक आदर्श उभा केला आहे. या योग्य निर्णयासाठी गावकऱ्यांनी कौतुक केले. सात सदस्य संख्या असलेल्या ग्रामपंचायमध्ये सहा महिला सदस्य आहेत. या महिलांनी या नवदाम्पत्याचा टावेल टोपी व साडीचोळी देवून सन्मान केला. यावेळी सरपंच यमुना चंद्रभान लहाने, पुष्पा उद्धव कंकाळ, सुनिता भागवत गारोळे, शिला बबन लहाने, उर्मिला खुशालराव लहाने, शोभा मधुकर पवार, सुभाष निंबाजी तायडे, माजी उपसभापती बबन लहाने, रामदास लहाने, भागवत गारोळे, विजय कंकाळ, लिंबांजी पवार, समाधान लहाने, विलास लहाने, ग्रामसेवक दत्ता काळे उपस्थित होते.समाजातील जुन्या प्रथेला फाटा देत मुलीच्या घरच्यांना मदत करण्याचा पवार कुटूंबियांचा प्रयत्न समाजासाठी दिशादर्शक आहे. लव्हाळा ग्रामपंचायतकडून वैयक्तीक लाभाच्या योजना प्राधान्याने या आदर्शवादी पवार कुटूंबियांना देण्याचा प्रयत्न ग्रामपंचायत प्रशासन करेल.- दत्ता भाष्करराव काळेग्रामसेवक, लव्हाळा.