खामगाव: 'शिका संघटीत व्हा...संघर्ष करा' असा मुलमंत्र देणारे महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती अभ्यासिकेला पुस्तके देऊन साजरी करण्यात आली.
खामगाव शहरातील खेल का मैदानावर स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करणार्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका निर्माण करण्यात आली आहे. स्पर्धा परिक्षेसाठी शिकवणी अथवा पुस्तके न खरेदी करू शकणारे विद्यार्थी येथे अभ्यास करतात. उपेक्षित, तळागाळातील होतकरू आणि गरीब विद्यार्थ्यांना वाचण्यासाठी स्पर्धा परीक्षांची महत्वाची तसेच एनसीईआरटीची पुस्तके उपलब्ध करून देण्यासाठी खामगाव येथील अपर पोलीस अधिक्षक अशोक थोरात यांनी पुढाकार घेतला.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबडेकरांच्या जयंती निमित्त अभ्यासिकेत पुस्तके पोहोचवून पोलीस दलाच्यावतीने बाबासाहेबांना अभिवादन केले. यावेळी अभ्यासिकेच्यावतीने प्रशांत खरात,संजय गवई आणि इतरांनी एएसपी थोरात यांचे तसेच उप पोलीस निरिक्षक सतीश आडे यांचे स्वागत केले. महापुरूषांचे आत्मचरित्र तसेच इतिहास पुरूषांच्या संघर्ष गाथेचीही पुस्तके यावेळी भेट देण्यात आली.