लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे हे कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. मुंबई येथील ब्रीच कॅन्डी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू असून, त्यांची प्रकृती ठणठणीत आहे. राजेंद्र शिंगणे यांना सोमवारपासून काहीसा त्रास होत होता. त्यामुळे त्यांनी कोरोना चाचणी केली असता, ती पॉझिटिव्ह आल्याचे त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. सध्या ते मुंबईतील ब्रीच कॅन्डी रुग्णालयात उपचार घेत आहेत. आपली प्रकृती उत्तम असल्याचेही त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. सोबतच आपल्या संपर्कात आलेल्यांनीही कोरोना चाचणी करून घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे. दरम्यान, ते कोरोनाबाधित झाल्याने मंत्रालयात १६ फेब्रुवारी रोजी झालेल्या लोणार व सिंदखेड राजा आणि शेगाव विकास आराखड्याच्या बैठकीला त्यांना उपस्थित राहता आले नाही.