येथील पोलीस स्टेशनच्या आवारात पावसाचे पाणी निचरा होत नसल्यामुळे तुंबत होते. पाऊस पडल्यानंतर पोलीस स्टेशन आवारातील तसेच पोलीस स्टेशनच्या समोरील रस्त्यावरून वाहत येणारे पाणी पोलीस स्टेशन आवारात जमा होत होते. त्यामुळे दैनंदिन काम करण्यास पोलीस कर्मचाऱ्यांना त्रास सहन करावा लागत होता. वाहनांना ने - आण करण्यास सुद्धा अडचण होत होती. पावसाळ्याचे चार महिने हा त्रास सहन करावा लागत होता. ठाणेदार चंद्रकांत ममताबादे यांनी सामाजिक कार्यकर्ते प्रवीण कदम यांच्याशी याबाबत चर्चा केली. सिंदखेडच्या सरपंच सीमा कदम यांनी स्वखर्चाने दोन शोषखड्डे पोलीस स्टेशनच्या आवारात तयार करून दिले.
२५ हजार रुपये आला खर्च
सिंदखेडच्या सरपंच सीमा कदम यांनी स्वखर्चातून हे काम करून दिले असून, यासाठी त्यांना सुमारे २५ हजार रुपये खर्च आला. दहा बाय दहा आणि दहा बाय सहा या आकाराचे हे दोन शोषखड्डे करण्यात आले आहेत. यामुळे पोलीस स्टेशन आवारातील तसेच बाहेरून येणाऱ्या पाण्याचा योग्य पद्धतीने निचरा होऊन वाया जाणारे पाणी जमिनीत मुरेल.