लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : मान्सून पूर्व नाले सफाईकडे नगर पालिका प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. पावसाळ्याला सुरूवात होण्यापूर्वीच नाले सफाई पूर्णत्वास जाणे अपेक्षीत असताना, प्रत्यक्षात आद्रा नक्षत्राला म्हणजेच पावसाळ्याला तब्बल १५ दिवसांचा कालावधी लोटल्यानंतर शहरातील मुख्य नाल्यासह काही नाल्यांची स्वच्छता केली जात आहे.खामगाव शहरातील स्वच्छतेकडे सुरूवातीपासूनच पालिका प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. नगर पालिका स्वच्छता विभागाकडून उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांविरोधात कोणतीही कारवाई केली जात नाही. त्याचवेळी शहरातील मुख्य नाले आणि अंतर्गत नाल्याच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष केले जाते. दरम्यान, यावर्षी देखील मान्सूनपूर्व स्वच्छतेकडे पालिकेकडून साफ दुर्लक्ष करण्यात आले. आता पालिकेने शहरातील मुख्य नाल्यासह अंतर्गत नाल्यांच्या सफाईला सुरूवात केली आहे. पाऊस पडताच शहरातील नाल्यांची स्वच्छता केली जात असल्याने, नाले सफाईकडे दुर्लक्षाचे औचित्य काय? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. शहरातील अनेक अंतर्गत नाल्यांची आणि मुख्य नाल्याचीही अनेक ठिकाणी स्वच्छता बाकी असल्याने पालिकेच्या स्वच्छतेच्या हेतूवर शंका उपस्थित होत आहे. अनेक नाल्यांची स्वच्छतेची प्रतीक्षा कायम! पावसाळ्याला सुरूवात झाल्यानंतरही अनेक दिवस नाले सफाईकडे पालिका प्रशासनाकडून दुर्लक्ष करण्यात आले. आता काही दिवसांपूर्वी नाले सफाईस ुसुरूवात करण्यात आली. आद्रा नक्षत्राला सुरूवात होईपर्यंत देखील मान्सूनपूर्व नाले सफाई पूर्णत्वास न गेल्याने पालिका प्रशासनाच्या मान्सूनपूर्व स्वच्छतेच्या हेतूबाबत शंका उपस्थित होत आहे. पाऊस आल्यास ताबतोब ही सफाई बंद करण्यात येवून कंत्राटदाराला स्वच्छतेचे पूर्ण बिल अदा केले जाईल, अशी चर्चा पालिका वर्तुळात असून, स्वच्छता कंत्राटदाराला आर्थिक लाभ पोहोचविण्यासाठी नाले सफाईकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे दिसते.
खामगावातील नालेसफाई कासव गतीने!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2019 2:26 PM