बांधकाम क्षेत्रात उपयुक्त असलेल्या अतिमहत्वाचा घटक म्हणून सिमेंट व लोखंडाचा (स्टिलचा) वापर करण्यात येतो. गेल्या दोन वर्षापासून सिमेंट व लोखंडाच्या (स्टिल) दरात सातत्याने वाढ होत आहे. जीडीपीत वाढ होण्यासाठी व देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये वाढ होण्यासाठी कृषी क्षेत्रानंतर दुसऱ्या क्रमांकाचे बांधकाम क्षेत्र असून देशामध्ये बांधकाम क्षेत्रामुळे दररोज सुमारे सहा कोटी कामगारांना रोजगार उपलबध होतो. सिमेंट व लोखंड (स्टिल) या क्षेत्राचा महत्वाचा घटक आहे. बांधकाम व्यवसायात जो माल वापरल्या जातो त्यांची किंमत सातत्याने वाढत असून बांधकाम क्षेत्रावर याचा विपरीत परिणाम होऊन सर्वसामान्य कामगारांच्या रोजगाराचा प्रश्न उद्भवत आहे. मजूरांना रोजगार कमी झाल्याने त्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. मागील वर्ष कोरोनामुळे महामारीमुळे अडचणीत गेले. बांधकाम व्यवसायावर अवलंबून असणारा घटक संपूर्णपणे आर्थिक डबघाईस गेला. आजरोजी बांधकाम क्षेत्रात नवीन कायदा लागू होऊन सर्व सामान्यांना परवडणारी घर मिळणार अशी आशा असताना आता सिमेंट व लोखंडाच्या दरवाढीने बांधकाम क्षेत्रात पुन्हा मंदी आली आहे.
दर कमी करण्याची मागणी
सिमेंट आणि लोखंडचे दरवाढ कमी करावी, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. निवेदन देताना ॲड. सुमित सरदार, सचिव डॉ. प्रकाश अंभोरे, अशोक व्यास, अश्विन सातपूते, गोपाल पंडीत, कुमार दलाल, मधुकर जोगदंड, मोरे, अनिल जाधव यादी उपस्थित होते.
अशी झाली दरवाढ
सिमेंट
जानेवारी २०१९ ३६० रुपये बॅग
फेब्रुवारी २०१९ ३९० रुपये बॅग
मे २०२० ४१० रुपये बॅग
डिसेंबर २०२० ४३० रुपये बॅग
लोखंड (टन)
जानेवारी २०१९ ४० हजार रुपये
सप्टेंबर २०२० ४५ हजार रुपये
नोव्हेंबर २०२० ५५ हजार रुपये
डिसेंबर २०२० ५८ हजार रुपये