सिंदखेडराजा: येथील वीज उपकेंद्रावर वाढदिवसानिमित्त महावितरणचे उप अभियंता व्ही. एल. पापुलवार व त्याच्या सहकाºयांनी ओली पार्टी केल्याचा मुद्दा सध्या ऐरणीवर आला असून राष्ट्रवादी काँग्रेसने या विरोधात २४ जून रोजी आंदोलन करत या उप अभियंत्यास तडकाफडकी बडतर्फ करण्याती मागणी केली आहे. २३ जून रोजी ही मद्याची पार्टी झाल्याची माहिती आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड. नाझेर काझी व त्यांच्या सहकाºयांनी हे आंदोलन केले. दरम्यान, २३ जूनला सायंकाळी व्ही. एल. पापुलवार यांनी सिंदखेडराजा येथील ३३ / ११ के. व्ही. उपकेंद्रावर मद्य पार्टी करून अधिकाराचा दुरुपयोग केला. या सर्व प्रकाराची समाजमाध्यमावर धुम सुरू असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड. नाझेर काझी यांनी या प्रकाराची दखल घेत सिंदखेड राजा येथे माहावितरणच्या कार्यालयासमोर निषेध आंदोलन केले व संबंधितास तडकाफडकी बडतर्फ करण्याची मागणी केली. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तथा ऊर्जा मंत्र्यांकडे केली आहे. दरम्यान, उप अभियंता पापुलवार यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यालयामध्येच मद्य प्राशन करून दंगामस्ती केली. याची माहिती मिळताच कार्यकारी अभियंता नितीन माळोदे यांना माहिती देवून करावाई करण्याची मागणी केली असल्याचे शिवसेना युवा प्रमुख योगेश म्हस्के यांनी सांगितले. ( तालुका प्रतिनिधी )
माझ्या वाढदिवसाला सात ते आठ व्यक्तींच्या उपस्थितीत पार्टी चालू असल्याचे फोटो सोशल मिडीयावर टाकून मला काही लोक ब्लॅकमेल करत आहेत. पार्टी जर सुरू होती तर त्यांनी पोलिसांना बोलावून कारवाई करायची असती.
- व्ही. एल. पापुलवार उप अभियंता, सिंदखेडराजा